– वीज बिलात बचत, पर्यावरणाचे रक्षण
नागपूर :- नागपूर जिल्ह्याला सौर जिल्हा म्हणून विकसित करण्यासाठी महावितरणने पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील बहुतांश घराच्या छतावर सोलर रुफ टॉप असावे यासाठी ग्राहकांसोबत थेट संवाद साधून त्यांना यासाठी प्रोत्साहीत करण्याची मोहीम महावितरणे सुरु केली आहे. वीज ग्राहकांच्या फ़ायद्यासोबतच पर्यावरण पुरक असलेल्या या मोहीमेत सहभागी होत अधिकाधिक नागपूरकर वीज ग्राहकांनी घराच्या छतावर सोलर रुफ टॉप बसविण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील अधिकाधिक घराच्या किंवा कार्यालयीन इमारतीच्या छतावर सौर ऊर्जा निर्मिती पॅनेल्स बसवून त्याद्वारे वीज निर्मिती करण्यासाठी महावितरणने ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. रूफ टॉप सोलर सिस्टिममुळे घरगुती वीज ग्राहकांचे बिल कमी होते व कधी कधी ते शून्य होते. छतावरील सौर ऊर्जानिर्मिती पॅनेलमधून वीजनिर्मिती होते. ती वीज घरगुती कामासाठी वापरली जाते. त्यामुळे महावितरणकडून ग्राहकाला कमी वीज घ्यावी लागते व परिणामी बिल कमी होते. जर गरजेपेक्षा जास्त वीजनिर्मिती झाली तर जास्तीची शिल्लक वीज महावितरणला विकली जाते व त्याचा मोबदला ग्राहकाला मिळतो. हा मोबदला नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यात नियमानुसार वीजबिलांच्या कपातीच्या स्वरुपात ग्राहकांना मिळतो. अशा रितीने रुफ टॉप सोलरचा घरगुती वीज ग्राहकांना मोफ़त ऊर्जेसोबतच निर्मान केलेल्या सौर ऊर्जेच्या माध्यमातून अतिरिक्त पैसे कमविणे, असा दुहेरी लाभ होतो.
सामान्य घरगुती ग्राहक सामान्यतः 1 ते 3 किलो वॅट क्षमतेची सिस्टिम बसविण्यासाठी बसविण्यासाठी उभारलेले स्ट्रक्चर, वायरिंग इत्यादीसाठी एक किलो वॅटला साधारणपणे 50 हजार ते 55 हजार रुपये खर्च येतो. यासाठी घरगुती ग्राहकांसाठी तसेच गृहनिर्माण संस्थांना सामाईक वापरासाठी केंद्र सरकारकडून तीन किलो वॅट पर्यंत प्रत्येक किलोवॅटला 18 हजार रुपये अनुदान मिळते. गृहनिर्माण संस्थांना सामायिक वापरासाठी पाचशे किलोवॅटपर्यंत नऊ हजार रुपये प्रती किलो वॅट अनुदान मिळते. याशिवाय बँकांकडून रूफ टॉप सोलरसाठी कर्ज मिळू शकते. त्याची परतफेड मासिक हप्त्यांमध्ये (EMI) करता येते.
रूफ टॉप सोलरचा खर्च वीजबिलातील सवलतीमुळे पाच ते सहा वर्षात वसूल होतो सर्वसाधारणपणे 25 वर्षे त्यातून वीजनिर्मिती होत राहते. याशिवाय स्वच्छ सूर्यप्रकाश असेल तर रूफ टॉप सोलरमुळे १ किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पात दररोज चार ते साडेचार युनिट वीजनिर्मिती होते. त्या प्रमाणात अधिक क्षमतेच्या प्रकल्पात अधिक वीज निर्माण होते.
रूफ टॉप सोलरमध्ये नेट मिटरींग पद्धती बसविली जाते. यामध्ये घरात येणारी वीज आणि घरातून वीज जाळ्यात दिली जाणारी वीज हे दोन्ही मोजले जाते. परिणामी दोन्हीचा फरक समजतो व त्यानुसार वीजबिलातील सवलत दिली जाते. महावितरण ही ग्राहकांना रूफ टॉप सोलर बसविण्यासाठी आणि सवलत मिळवून देण्यासाठी मदत करते. महावितरणच्या https://www.mahadiscom.in/ismart/ या वेबसाईटवर रूफ टॉप सोलर बसविण्याविषयीची सर्व माहिती उपलब्ध आहे.
या मोहीमेत वीज ग्राहकांन सहभागी करुन घेण्यासाठी, महावितरणतर्फ़े ठिकठिकाणी बैठकी, मेळावे आणि जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून महावितरणच्या या प्रयत्नांना नागपुरकर वीज ग्राहकांनी सकारात्म प्रतिसाद देण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे. महावितरणच्या या प्रयत्नांना बळ देण्यासाठी सोलर रुफ़ टॉप यंत्रणा बसविणा-या एजन्सीजने देखिल पुढाकार घेत ग्राहका जागृतीची मोहीम हाती घेतली आहे.