प्रत्येकाने अभियानात सहभागी होण्याचे आयुक्तांचे आवाहन
नागपूर : केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार नागपूर महानगरपालिकेतर्फे स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षी अमृत महोत्सवांतर्गत १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा अभियान’ राबविण्यात येणार आहे. या उपक्रमा अंतर्गत सेल्फी स्टँडचे मनपा आयुक्त आणि प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी सोमवारी (ता.१८) मनपा प्रशासकीय इमारत येथे लोकार्पण केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त दीपक कुमार मीना, उपायुक्त रवींद्र भेलावे, क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर उपस्थित होते.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात स्वतंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत राहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी म्हणून ५ लाख नागरिकांच्या घरी 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत स्वखर्चाने राष्ट्रीय ध्वज उभारणे अपेक्षित आहे. नागपूर महानगरपालिकेतर्फे स्थानिक नागरिकांना राष्ट्रध्वज संहिता अंतर्गत तिरंगा ध्वज उपलब्ध करण्याचे निश्चित केले आहे. नागपूर महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना तसेच ज्यांची आर्थिक स्तिथी बरोबर नाही, त्यांच्या करीता मनपातर्फे राष्ट्रध्वज उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मनपा अधिकारी आणि कर्मचारी यासाठी सहकार्य करीत आहेत.
मनपा आयुक्तांनी नागरिकांना या अभियानात मोठ्या उत्साहाने सहभागी होण्याचे आणि आर्थिक दृष्ट्या कमकुबत नागरिकांना राष्ट्रध्वज भेट देण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, नागरिक सुती, रेशमी, पॉलीस्टर, लोकर किंवा खादीच्या तिरंगा झेंड्याचा वापर करू शकतात. घरी लावलेल्या झेंड्यापुढे स्वत: किंवा परिवारासोबत सेल्फी काढून मनपाच्या सोशल मीडियाला टॅग करावे. निवडक सेल्फी मनपाच्या सोशल मीडियावर प्रकाशित करण्यात येणार आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे साक्षीदार होण्यासाठी स्वातंत्र्याचा गौरव करण्या प्रत्येकाने आपल्या घरी तिरंगा फडकाविण्याचे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.