नागपूर :- महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणेशाच्या आगमनाला काही दिवसच शिल्लक असून येणारा गणेशोत्सव आनंददायी व निर्विघ्न पार पडावा यासाठी ग्राहकांना दर्जेदार, अखंडित व सुरळीत वीजपुरवठा मिळावा म्हणून वीज वाहिन्या व वीज उपकरणांच्या देखभाल व दुरुस्तीची कामे तातडीने पुर्ण करावयाच्या सुचना मुख्य अभियंता दिलिप दोडके यांनी महावितरणच्या नागपूर परिमंडलातील सर्व कार्यालयांना दिल्या आहेत.
वीज तारांच्या लगतच्या झाडांच्या फ़ांद्या तोडणे, रोहीत्रे, वितरण पेट्यांची आवश्यक ती दुरुस्ती करणे, उपकेंद्रातील उपकरणांची तपासणी व दुरुस्ती करणे, नादुरुस्त असलेले किटकॅट बदलविणे, रहदारीच्या ठिकाणी लघुदाव व उच्चदाब वाहिन्यांचे गार्डिंग व्यवस्थित करून घेणे, योग्य क्षमतेचे वितळ तार (फ़्यूज वायर) टाकणे, विभागिय, मंडळ आणि क्षेत्रिय स्तरावरील नियंत्रण कक्ष तीनही पाळ्यांत (24X7) सुरु ठेवणे आदी कामे प्राधान्याने करण्याचे निर्देशही दोडके यांनी दिले आहेत.
महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने सर्वधर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवांच्या तात्पुरत्या वीजजोडणीसाठी घरगुती ग्राहकांप्रमाणे वीजदर निश्चित केले आहेत. गणेशोत्सवा करिता गणेशमंडळांना तात्पुरत्या स्वरुपातील वीजपुरवठा नियमाप्रमाणे आणि त्वरित देण्याच्या सूचना सर्व अधीनस्थ अधिकारी व कर्मचा-यांना देण्यात आल्या असून गणेशोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात जनतेचा सहभाग असल्याने अश्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे वीज अपघात होणार नाही यासाठी स्थानिक कर्मचारी व अधिका-यांनी दक्ष राहून योग्य त्या उपाययोजना करणे क्रमप्राप्त आहे. सार्वजनिक उत्सवांकरिता अधिकृत वीज जोडणी घेणे आवश्यक असल्याने अश्या ठिकाणी अनधिकृत वीजजोडणी आढळलेल्या मंडळांना दक्षता पथक आणि महावितरणच्या संबंधित अभियंता व कर्मचा-यांनी अपघात टाळण्याकरिता सुरक्षा व वीज चोरीच्या परिणामांबाबत जाणीव करुन देत त्यांना अधिकृत वीज जोडणी घेण्याबाबत प्रवृत्त करावे याशिवाय जे मंडळ अधिकृत वीज जोडणी घेण्यास पुढाकार घेणार नाहीत अश्या मंडळांचा वीज पुरवठा सुरक्षेच्या दृष्टीने ताबडतोब बंद करून त्यांच्याविरोधात नियमानुसार कार्यवाही करण्याच्या सुचनाही मुख्य अभियंता यांनी दिल्या आहेत.
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या स्थापना आणि विसर्जनाच्या दिवशी आवश्यक स्थानांवर स्थळांवर मागणी करण्यात आलेला तात्पुरता वीजभार त्वरित देण्यात यावा, याशिवाय विसर्जनाच्या दिवशी वीज पुरवठा अखंडित राहील यासाठी विभागीय अधिकारी, उपविभागीय अधिकारी व शाखा अधिकारी यांनी विसर्जन प्रक्रीया पुर्ण होईपर्यंत स्वत: जातीने उपस्थित राहण्याच्या सुचनाही करण्यात आल्या आहेत.
संपुर्ण गणेशोत्सव काळात सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी मुख्यालयी असणे बंधनकारक असून सक्षम अधिका-यांच्या परवानगीशिवाय कुणीही मुख्यालय सोडू नये, गणेश मूर्ती विसर्जन मिरवणूक मार्गावरील उपरी वाहिन्यांचा मिरवणुकीतील मूर्ती किंवा देखावे यांना अडथळा होणात नाही याची अगोदरच सर्वेक्षण करून त्याअनुषंगाने तजबीज करावी, दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करून जनमित्र पातळीपर्यंत याबाबत सर्वांना आवश्यक ते दिशानिर्देश सूचना देखील दिलीप दोडके यांनी केल्या आहेत.