यवतमाळ :- महाऊर्जाद्वारे महाकृषी ऊर्जा अभियान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वेगवेगळ्या क्षमतेचे सौर पंप अनुदानावर दिल्या जाते. पंपाच्या लाभ मिळवितांना शेतकरी लाभार्थ्यांनी अवैध व फसवे संकेतस्थळ तसेच प्रलोभन दाखविणाऱ्यांपासून सावध राहावे, असे आवाहन महाऊर्जाद्वारे करण्यात आले आहे.
योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ३, ५ व ७.५ अश्वशक्ती क्षमतेचे पारेषण विरहित सौर कृषी पंप देण्यात येत आहेत. याकरीता सौर कृषी पंपासाठी पात्र लाभार्थ्यांना सौरपंपाच्या क्षमतेनुसार खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांस १० टक्के आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांस ५ टक्के लाभार्थी हिस्सा भरण्यासाठीचा एसएमएस पाठविला जातो. सदर योजना राबविण्याकरीता महाऊर्जामार्फत स्वतंत्र ऑनलाईन पोर्टल तयार करण्यात आले असुन लाभार्थी शेतकऱ्यांनी https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B, https://kusum.mahaurja.com/beneficiary/ या संकेतस्थळांचा उपयोग नोंदणी व इतर माहिती प्राप्त करण्याकरीता करावयाचा आहे. ऑनलाईन लिंक व्यतिरिक्त महाऊर्जामार्फत कोणत्याही प्रकारे शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारण्यात येत नाहीत. परंतु सद्यःस्थितीत वेगवेगळ्या बनावट वेबसाईट, सोशल मीडिया प्लॅटफार्म इत्यादींमार्फत शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करण्यात येत असल्याचे तसेच शेतकऱ्यांना लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी खोटे संदेश पाठविण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे.
अशा खोट्या, फसव्या संकेतस्थळांना, फसव्या दुरध्वनी, भ्रमणध्वणीच्या आवाहनाला शेतकऱ्यांनी बळी पडु नये व अशा संकेतस्थळावर अॅपवर कोणत्याही पध्दतीने पैशाचा भरणा करु नये, असे आवाहन महाऊर्जाच्या विभागीय महाव्यवस्थापकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी जिल्हा कार्यालय, महाऊर्जा, दुरध्वनी क्र.०७२३-२२४११५० व doyavatmal@mahaurja.com वर संपर्क साधावा तसेच विभागीय कार्यालय, महाऊर्जा, अमरावती दुरध्वनी क्र. ०७२१-२६६१६१० व domedaamravati@mahaurj.com वर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.