मुंबई :- ‘चांद्रयान-3’ने चंद्रावर केलेल्या यशस्वी लॅण्डींगमुळे अमेरिका, रशिया, चीननंतर भारत जगातील चौथी अंतराळशक्ती ठरला आहे. ‘चांद्रयान-3’च्या यशाने जगात भारताची मान उंचावली असून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल, अशी ही ऐतिहासिक घटना आहे. देशातील शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, संशोधकांच्या, देशवासीयांच्या अथक परिश्रमांचे हे फळ आहे. ‘चांद्रयान-3’च्या मोहिमेत मुंबई, पुणे, सांगली, जळगाव, बुलढाणा, वालचंदनगर, जुन्नर आदी शहरांनीही महत्वाची भूमिका बजावली. समस्त देशवासीयांच्या एकजुटीतून मिळालेले हे यश असल्याचे सांगत ‘चांद्रयान-3’ मोहिमेत योगदान दिलेल्या इस्त्रोचे शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, अधिकाऱ्यांसह देशवासीयांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या काळात देश यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
‘चांद्रयान-3’ची मोहीम यशस्वी झाल्याबद्दल आनंद व्यक्त करुन उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, भारत गेल्या अनेक दशकांपासून अंतराळ क्षेत्रातील महाशक्ती म्हणून कार्यरत होता. आजच्या चांद्र मोहिमेच्या यशाने त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. अत्यंत कमी खर्चात नियोजनबद्ध पद्धतीने ही मोहीम राबविण्यात आली. ‘इस्त्रो’च्या शास्त्रज्ञांनी त्यासाठी अपार कष्ट घेतले. महाराष्ट्रानेही आपले योगदान दिले. मुंबईतील गोदरेज एरोस्पेसमध्ये यानाचे काही भाग बनवण्यात आले. सांगलीत रॉकेटचे पार्ट कोटिंग करण्यात आले. पुण्यातील कंपनीत फ्लेक्स नोझल आणि बुस्टर, तर जळगावात एचडी नोझल्स तयार करण्यात आले. बुलढाण्यातील खामगावाची चांदी आणि थर्मल फॅब्रिक चांद्रयानासाठी वापरण्यात आले. पुण्यातील जुन्नरच्या दोन शास्त्रज्ञांनी मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. इंदापूरची वालचंद इंडस्ट्री गेली 50 वर्षे इस्त्रोच्या प्रत्येक मोहिमेत योगदान देत आहे. ‘चांद्रयान-3’च्या यशस्वी मोहिमेत महाराष्ट्राचेही मोठे योगदान असून तेही कायम लक्षात ठेवले जाईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केला आहे.