मुंबई :- महाराष्ट्र शाहीर पद्मश्री कृष्णराव साबळे यांच्या जन्मशताब्दी वर्ष सोहळ्याचा शुभारंभ विधानसभा अध्यक्ष अॅड राहुल नार्वेकर आणि राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सोमवारी, दिनांक २० मार्च रोजी होणार आहे. यशवंतराव चव्हाण केंद्र, नरिमन पॉईंट येथे सायंकाळी सहा वाजता उद्घाटन होणार असुन कार्यक्रमास मुंबई शहरचे पालकमंत्री तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार अरविंद सावंत उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र शाहीर साबळे यांच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या “रंग शाहिरीचे..” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे लेखन लोककलेचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांनी केले आहे तर दिग्दर्शन संतोष पवार यांनी केले आहे. गण, गवळण, वासुदेव गीत, कोके वाल्याचे गीत, नृत्याची लावणी, बैठकीची लावणी, गोंधळी गीते, वाघ्या मुरळ्यांची गीते आणि त्यावरील नृत्य असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे. यामध्ये नंदेश उमप, प्रा.डॉ. गणेश चंदनशिवे, चारुशीला वाच्छानी, विवेक ताम्हणकर, संतोष पवार, नागेश मोरवेकर, हेमाली शेडगे, सुखदा खांडगे खैरे, योगेश चिकटगावकर, विकास कोकाटे, सुभाष खरोटे, शाहीर लिंगायत आणि अन्य कलावंत सहभागी होत आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केले आहे.