राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2024 मध्ये महाराष्ट्राचे खेळाडू चमकले

– मुरलीकांत पेटकर यांचा क्रीडा क्षेत्रातील आजीवन योगदानाबद्दल अर्जुन पुरस्काराने (जीवनगौरव) गौरव

– दीपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर

– स्वप्नील कुसाळे आणि सचिन खिलारी यांना अर्जुन पुरस्कार

नवी दिल्ली :- महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आणि प्रशिक्षकांनी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2024 मध्ये सर्वोच्च सन्मान मिळवून राज्याला पुन्हा एकदा वैभव मिळवून दिले आहे. 17 जानेवारी 2025 रोजी राष्ट्रपती भवनात भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात येणारे हे पुरस्कार केवळ त्यांच्या यशाचा नव्हे, तर आव्हानांवर मात करत, देशाला प्रेरणा देण्याच्या त्यांच्या निर्धाराचाही बहुमान ठरेल.

महाराष्ट्राचे असामान्य पुरस्कार विजेते:

मुरलीकांत राजाराम पेटकर – अर्जुन पुरस्कार (आजीवन योगदान, पॅरा-स्विमिंग)

पेटकर यांचे जीवन चिकाटी आणि अखंड चैतन्याची विलक्षण कथा आहे. पॅरा स्विमिंगमध्ये अग्रेसर असलेले मुरलीकांत पेटकर यांनी या खेळासाठी आजीवन दिलेल्या योगदानाचा अर्जुन पुरस्काराने (जीवनगौरव) गौरव केला जात आहे. मूळचे ग्रामीण महाराष्ट्रातील असलेले पेटकर यांनी तरुणपणी कुस्ती या क्रीडा प्रकारात आपला प्रवास सुरू केला आणि पुढे विविध क्रीडा स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.

त्यांच्या कारकि‍र्दीची ठळक वैशिष्ट्ये:

· टोकियो ऑलिम्पिक मध्ये मुष्टियुद्ध स्पर्धेत भारतीय लष्कराचे प्रतिनिधित्व.

· 1965 च्या भारत-पाक युद्धात बंदुकीच्या अनेक गोळ्या लागल्या, त्यामुळे ते पॅरा-स्पोर्ट्सकडे वळले.

· 1972 उन्हाळी पॅरालिम्पिकमध्ये जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून ते भारताचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते ठरले.

मुरलीकांत राजाराम पेटकर यांनी आपल्या क्रीडाक्षेत्रातील कारकिर्दीत आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये 12 सुवर्णपदके, राष्ट्रीय स्तरावर 34 सुवर्णपदके आणि राज्य स्तरावर मिळवलेल्या तब्बल 40 सुवर्णपदकांचा समावेश आहे. क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने आणि 2018 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

दीपाली देशपांडे – द्रोणाचार्य पुरस्कार (नेमबाजी)

दीपाली देशपांडे यांनी अत्यंत समर्पित वृत्तीने दिलेल्या अथक प्रशिक्षणाने भारतीय नेमबाजी प्रकारातील परिदृश्यात परिवर्तन घडवून आणले आहे. द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात 1985 पासून झाली. प्रशिक्षकांना त्यांच्या सातत्यपूर्ण उत्कृष्ट कार्यासाठी आणि खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यास सक्षम करण्यासाठी द्रोणाचार्य पुरस्कार दिला जातो. द्रोणाचार्य पुरस्काराच्या मानकरी प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांच्या अथक प्रयत्नांमुळे युवा नेमबाजांना योग्य मार्गदर्शन लाभून त्यांना जागतिक स्तरावर आपले नाव कोरता आले आहे. त्यांच्या या कार्यामुळे खेळाडूंच्या प्रतिभेला अधिक संपन्न बनवण्याचे आणि नेमबाजी खेळातील भारताच्या भविष्यासाठी मजबूत पाया तयार करण्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

स्वप्नील सुरेश कुसाळे – अर्जुन पुरस्कार (नेमबाजी)

रेल्वेमधील तिकीट तपासनीस पदावरून देशातील सर्वात लोकप्रिय नेमबाज होण्यापर्यंतचा स्वप्नील कुसाळे याचा प्रवास खरोखर उल्लेखनीय आहे. 2024 मधील पॅरिस ऑलिम्पिकमध्ये त्याची कामगिरी अभूतपूर्व ठरली. पुरुष नेमबाजीत 50 मीटर रायफल 3 पोझिशन्स मध्ये पदक जिंकणारा स्वप्नील पहिला भारतीय नेमबाज बनला, अंतिम फेरीत त्याने 451.4 अशा उत्कृष्ट गुणांची कमाई करुन कांस्यपदक मिळवले.

पुणे येथे जन्मलेल्या आणि तिथंच लहानाचा मोठा झालेल्या , या 28 वर्षीय तरुणाच्या कारकिर्दीची सुरुवात 2015 मध्ये झाली. त्याने आपल्या नोकरीतील कमाईचा वापर करून पहिली रायफल खरेदी केली. त्याच वर्षी, त्याने कुवेत येथे झालेल्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत 50 मीटर रायफल प्रोन 3 कनिष्ठ गटात सुवर्णपदक जिंकून आंतरराष्ट्रीय मंचावर दणदणीत आगमन केले.

कुसळे याच्या कारकिर्दीतील ठळक वैशिष्ट्यांमध्‍ये समावेश असलेले टप्‍पे:

• कैरो, इजिप्त येथे 2022 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये चौथे स्थान मिळवून पॅरिस 2024 ऑलिम्पिक सहभागासाठी ठरला पात्र

• हँगझोऊ 2022 आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक

सचिन सर्जेराव खिलारी – अर्जुन पुरस्कार (पॅरा-ॲथलेटिक्स)

सांगलीतील शेतकऱ्याच्या मुलाने जागतिक पॅरा-ॲथलेटिक्स चॅम्पियनपर्यंत झेप घेतली आहे. सचिन खिलारी याची कहाणी म्हणजे जिद्द आणि चिकाटीची पुरावा आहे. बालपणी झालेल्‍या दुखापतीमुळे त्याचा डावा हात अधू झाला, पण त्याने स्‍वत:ला विशिष्‍ट हालचालीपुरते मर्यादित ठेवण्यास नकार दिला. पॅरिस 2024 पॅरालिम्पिकमध्ये, खिलारीने पुरुषांच्या शॉट पुट एफ 46 इव्हेंटमध्ये 16.32 मीटरच्या आशियाई विक्रमासह रौप्यपदक जिंकले. या स्पर्धेत कॅनडाच्या ग्रेग स्टीवर्ट (16.38 मी) याने सुवर्ण पदक जिंकले.

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2024 च्या विजेत्यांची संपूर्ण यादी येथे पाहता येईल.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

महसूल गुप्तचर संचालनालयाने केलेल्या कारवाईत सोन्याची तस्करी करणाऱ्या विमानतळ कर्मचाऱ्यांना केली अटक

Sat Jan 4 , 2025
– 4.84 कोटी रुपये किमतीचे 6.05 किलो सोने जप्त करण्यात आले मुंबई :- मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ड्युटी फ्री दुकानात काम करणाऱ्या आणि सोन्याची तस्करी करणाऱ्या टोळीशी संबधित विमानतळ कर्मचाऱ्यांच्या गटाला महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) ताब्यात घेतले. हे कर्मचारी आंतरराष्ट्रीय ट्रान्झिट टर्मिनलमधून छोट्या गटांमध्ये आणलेले सोने विमानतळाबाहेर पोहोचवून त्याची तस्करी करत होते. विमानतळाबाहेर तस्करीचे सोने घेऊन जात असताना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!