नागपुर :- महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, गट कार्यालय क्र.1च्या विद्यमाने गटस्तरिय कामगार पुरुष भजन स्पर्धा -2023-2024चा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच ललित कला भवन इंदोरा येथे पार पडला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध कीर्तनकार व तबला विशारद उमेश बारापात्रे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून डेक्कन समूहाचे अध्यक्ष राजेश खरे, विशेष अतिथी सहा. कल्याण आयुक्त नंदलाल राठोड, व कामगार कल्याण अधिकारी प्रतिभा भाकरे प्रामुख्याने उपस्थित होत्या.गटस्तरिय स्पर्धेत उत्स्फूर्त पणे अनेक भजन मंडळांनी सहभाग घेवून आपल्या संगीतमय गायनाद्वारे भक्तिमय वातावरणाची निर्मिती करीत श्रोत्यांची मने जिंकली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते उत्कृष्ट भजन मंडळास प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ व धनादेश देवून गौरविण्यात आले. संचालन सहा.कल्याण अधिकारी दानी यांनी केले व आभार मानले. कार्यक्रमात प्रसिद्ध नाट्य कलावंत संजीवनी चौधरी, दिलीप पवार, शेख असलम, अयुब शेख, यांच्यासह कामगार कल्याण मंडळांचे पदाधिकारी, कर्मचारी, भजन मंडळाचे स्पर्धक महानुभाव तसेच नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.