– देशात औद्यागिक क्षेत्रात सर्वात जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात
पुणे :- औद्योगिक गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र सर्वोत्तम राज्य असून, देशातील सर्वात जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तळेगाव येथील हॅवमोर लोट्टे आईस्क्रीम उत्पादन प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी फडणवीस बोलत होते.
यावेळी कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार सुनील शेळके, लोट्टे समूहाचे अध्यक्ष डोंग बीन शीन, रिपब्लिक ऑफ कोरियाचे भारतातील राजदूत शेंग हो ली, उद्योग विभागाचे सचिव पी अन्बलगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी वेलारासू, माजी आमदार बाळा भेगडे, हॅवमोर आईस्क्रीम इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक कोमल आनंद आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, दावोस मधील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राचा दबदबा होता. अनेक गुंतवणुकीचे करार या ठिकाणी करण्यात आले. विविध उद्योजकांशी चर्चा करुन, त्यांच्या समस्या जाणून घेत आहोत, राज्यातील गुंतवणूक वाढीसाठी प्रयत्न करीत आहोत. दोनच दिवसांपूर्वी मैत्री कक्षाचे नूतनीकरण करण्यात आले. या पोर्टलवर उद्योगासाठी आवश्यक असणारी सर्व व्यवस्था उपलब्ध करुन दिली आहे. ‘Ease of doing business’ या धोरणानुसार शासनाचे काम सुरू आहे.
आपल्याला लहानपणी आईस्क्रीम खूप आवडायचे. एक महिना आईस्क्रीम फॅक्टरी मध्ये राहायला जावे असे वाटायचे, असे सांगत या प्रकल्पाचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बालपणीच्या आठवणीत काही क्षण रमले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोट्टे आईस्क्रीम उत्पादन सुविधांचे उद्घाटन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आईस्क्रीम प्रकल्पाची पाहणी केली.
समूहाचे अध्यक्ष डोंग बीन शीन म्हणाले, लोट्टेच्या प्रवासातील एक महत्वाचा टप्पा असलेल्या या प्रकल्पाचे उद्घाटन करताना आम्हाला अभिमान वाटतो, भारत आमच्यासाठी एक महत्वाची बाजारपेठ आहे, आणि आमच्या जागतिक कामकाजाचा अविभाज्य भाग आहे. हॅवमोरला भारतातील सर्वात लोकप्रिय आईस्क्रीम ब्रँड बनविण्याच्या उद्देशाने आम्ही पुण्यातील प्रकल्पामध्ये १६ प्रॉडक्शन लाईन्स सुरू करणार आहोत.
रिपब्लिकन ऑफ कोरियाचे भारतातील राजदूत शेंग हो ली यांनीही मनोगत व्यक्त केले. हा आईस्क्रीम प्रकल्प एकूण साठ हजार चौरस मीटर क्षेत्रात विस्तारलेला असून, या प्रकल्पात ५० दशलक्ष लिटर अशी प्रभावी वार्षिक उत्पादन क्षमता आहे. पुण्यातील या प्रकल्पाची रचना विशेष करुन तीव्र उन्हाळ्याच्या काळात आईस्क्रीमची मागणी पूर्ण करण्यासाठी करण्यात आली आहे. या प्लँटमध्ये नऊ प्रोडक्शन लाईन कार्यरत आहेत. हॅवमोर प्रकल्प आपल्या विकासाला पुढील तीन वर्षात अधिक गती देईल. पाचशे कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह हा ऐतिहासिक उत्पादन प्रकल्प पुढील दोन वर्षात हजार लोकांना रोजगार देईल, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल.
कार्यक्रमाला स्थानिक कोरीअन असोसिएशन समुदाय सदस्य, लोट्टे इंडियाचे व्यवसाय सहकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.