मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांच्या मागे महाराष्ट्र नाही; हे जनाधार नसणारं सरकार – जयंत पाटील

मुख्यमंत्री बोलत आहेत आणि खुर्चीवर माणसेच नाहीत यातून आज काय परिस्थिती आहे हे स्पष्टपणे महाराष्ट्रापुढे आले…

मुंबई :- मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांच्या मागे महाराष्ट्र नाही. हे जनाधार नसणारं सरकार आहे. लोकांचा पाठिंबा नाही हे वारंवार सिद्ध होत आहे असा जोरदार हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना शिंदे – फडणवीस सरकारवर केला.

आज विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानभवनात पार पडली. त्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार टिका केली.

महाराष्ट्रातील जनमत या सरकारला पाठिंबा देत नाही. अनेक ठिकाणी या नेत्यांच्या सभा होतात त्यावेळी खुर्च्या रिकाम्या असतात आणि नेते मात्र बोलत असतात. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वरळीची सभा महाराष्ट्रात व्हायरल झाली मुख्यमंत्री बोलत आहेत आणि खुर्चीवर माणसेच नाहीत यातून आज काय परिस्थिती आहे हे स्पष्टपणे महाराष्ट्रापुढे आले आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याचा मुद्दा पत्रकारांनी विचारला असता शिंदे गटाच्या आमदारांनी अशा थराला पोचायला नको हे दुर्दैवी आहे. शिंदे गटाच्या आमदारांना पराभव डोळ्यासमोर दिसू लागल्याने त्यांनी ही कृती केली आहे असा आरोपही जयंत पाटील यांनी यावेळी केला.

जेव्हा मुद्दे संपतात तेव्हा विरोधक गुद्दयावर येतात. आदित्य ठाकरे आपल्या मतदारसंघात आले याची भीती बंडखोर आमदारांच्या मनात असल्यामुळे दहशत पसरवणे, त्यांच्यावर दगडफेक करणे असा प्रकार केला आहे ही नाकर्तेपणाची भूमिका आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

महाराष्ट्रात बिहारसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्राचा बिहार या लोकांनी केला. महाराष्ट्रात पत्रकार सुरक्षित नाहीत. पत्रकारांवर दबाव आणून पाहिजे त्या गोष्टी लोकांसमोर आणायच्या हा कावा सत्तारुढ पक्षाचा दिसतो त्यामुळे पत्रकाराला चिरडून मारण्यात आल्याच्या प्रकाराचा राष्ट्रवादी काँग्रेस निषेध करत असल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

रत्नागिरीत एका पत्रकारावर गाडी घालून चिरडून मारल्याची घटना पत्रकारांनी विचारली असता जयंत पाटील यांनी या घटनेचा निषेध केला.

‘महानगरी टाइम्स’ चे पत्रकार शशिकांत वारिशे हे रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात जे जनमत होते त्याची बाजू मांडत होते. मात्र रिफायनरी झाल्यावर त्यातून लाभ मिळणार असल्याने भाजपच्या एका कार्यकर्त्याने चिडून शशिकांत वारिशे यांना गाडीखाली चिरडले आहे ही घटना दुर्दैवी आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

अर्थसंकल्पीय अधिवेशन हे नेहमी पाच आठवड्यांचे असते मात्र आताच्या अधिवेशनात फक्त १७ दिवसांचे कामकाज होणार आहे. या अधिवेशनामध्ये सदस्यांना अधिक चर्चा करायला आणि काही गोष्टी विस्तारीतपणे मांडता याव्यात असा ठराव आज विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत मांडल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली शपथ

Wed Feb 8 , 2023
मुंबई  :- विधानपरिषदेचे नवनिर्वाचित सदस्य विक्रम काळे, सुधाकर अडबाले, सत्यजित तांबे, ज्ञानेश्वर म्हात्रे आणि धीरज लिंगाडे यांना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज सदस्यत्वाची शपथ दिली. विधानमंडळात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शिक्षक मतदारसंघातून तीन तर पदवीधर मतदारसंघातून दोन विधानपरिषद सदस्य निवडून आले आहेत. उपसभापती […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!