महाराष्ट्राची पर्यटन पंढरी असलेल्या कोकणाचा सर्वांगीण विकास करण्यावर भर
सिंधुदुर्गनगरी :- “कोकणाला निसर्गाचा वरदहस्त लाभला आहे. ‘येवा कोकण आपलोच आसा’ असा पाहुणचार करणाऱ्या कोकणाचा सर्वांगीण विकास करण्यावर भर आहे. त्याचबरोबर राज्यातील जनतेला पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी अनेक प्रकल्प राज्यात सुरु आहेत. देशात सर्वात जास्त पायाभूत सुविधा प्रकल्प सुरु असलेले महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे”, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
सावंतवाडी शहर व सावंतवाडी मतदार संघातील 110 कोटींच्या विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमीपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे, ग्रामविकास क्रीडा व युवक कल्याणमंत्री गिरीश महाजन, उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार रविंद्र फाटक, आमदार भरत गोगावले, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, युवराज लखमराजे सावंत-भोसले, कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, प्रातांधिकारी प्रशांत पानवेकर आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “महाराष्ट्राला पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याबरोबरच युवा पिढीला रोजगार उपलब्ध करुन देण्यावर राज्य शासनाने भर दिला आहे. नोकरी मागणाऱ्या हातापेक्षा नोकरी देणारे हात निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. महिला बचतगटांना सक्षम करण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे. मुलभूत सुविधांबरोबरच आरोग्य सुविधाही जिल्हा, तालुका पातळीपर्यंत व ग्रामीण भागापर्यंत सक्षम करण्यावर भर देण्यात येत आहे. महाराष्ट्र वेगाने प्रगत होत आहे. यासाठी केंद्राकडूनही मदत मिळत आहे. केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणाऱ्या प्रस्तावांना तातडीने मंजुरी देऊन निधी देण्यात येत आहे. त्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार. भारत देश गतीने विकास करत असून देशाची अर्थव्यवस्था ११ क्रमांकावरुन ५ व्या क्रमांकावर आली आहे. तसेच जी-२० चे अध्यक्षपद आपल्या देशाला मिळाले ही अत्यंत गौरवाची बाब आहे”. असेही मुख्यमंत्री म्हणाले.
महाराष्ट्र वेगाने प्रगती करत असून अलिकडच्या काळात १ लाख १४ हजार कोटी परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आलेली आहे. या गुंतवणुकीमुळे रोजगार निर्मितीला चालना मिळेल”, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त करुन कोकणाच्या विकासासाठी कोकण प्राधिकरणाची निर्मिती करण्याचे काम सुरु केल्याचे सांगितले. कोकणातील कोस्टल रोड एमएसआरडीसीच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येईल. कोकणात सबमरीन सुरु करण्यासाठी आवश्यक निधी देण्यात येईल. त्याचबरोबर कोकणातील स्थानिक मालाचे ब्रॅंडिंग करुन मार्केटिंग उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केले जातील. सावंतवाडी शहरातील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलही उभारण्यासाठी निधी देऊ. असे सांगून समृध्द कोकण घडविण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करुया, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, कोकणाचा गतिमान विकास होण्यासाठी दरडोई उत्पन वाढीसाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. जिल्ह्यात दोडामार्ग येथे सुरु झालेल्या एमआयडीसी मध्ये जास्तीत जास्त उद्योग येतील, यासाठी केंद्र व राज्य शासन प्रयत्न करेल. आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले, “जास्तीत जास्त उद्योग हे सिंधुदुर्गामध्ये आणून येथील युवकांना रोजगाराची संधी मोठ्या प्रमाणात मिळेल, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत, जेणेकरुन स्वयंरोजगाराचे केंद्र हे सिंधुदुर्ग ठरेल. गोवा राज्याप्रमाणे सिंधुदुर्गमध्येही उत्कृष्ट पर्यटन सोयीसुविधा निर्माण होणे आवश्यक आहे.
कमीत कमी खर्चामध्ये सावंतवाडी येथे नदी शुध्दीकरण हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा मोती तलावाच्या मध्यभागी बांधण्यासाठी 1 कोटी रुपये निधी दिला जाईल, असे सांगून श्री. केसरकर पुढे म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नौदलाचा वर्धापन दिन सिंधुदुर्ग जिल्ह्यात साजरा होणार आहे. या कार्यक्रमांचे भव्यदिव्य आयोजन करण्यात येईल.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सावंतवाडी शहरातील संत गाडगेबाबा महाराज मंडई आणि शॉपिंग सेंटर विकसित करणे, सावंतवाडी नगरपरिषदेच्या जिमखाना मैदान येथे द्रोणाचार्य पुरस्कार विजेते गुरुवर्य रमाकांत आचरेकर ड्रेसिंग रूम बांधणे, महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियान (राज्यस्तर) योजनेअंतर्गत अग्निशमन वाहन खरेदी, अग्निशमन सेवा व आणीबाणीच्या सेवांचे बळकटीकरण (जिल्हास्तर) या योजनेअंतर्गत अग्निशमन केंद्र व अग्निशमन सेवेतील अधिकारी/कर्मचारी यांचे सेवा निवासस्थान बांधकाम, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान (राज्य स्तर) योजनेअंतर्गत सावंतवाडी शहरातील पाणी पुरवठा योजना सुधारणा, सावंतवाडी शहरातील जीर्ण झालेली वितरण व्यवस्था बदलणे आदींसह सुमारे 110 कोटींच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला.
हळवल तालुका कणकवली येथील वारकरी संप्रदायाला वाहन लोकार्पण
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी हळवल ता. कणकवली येथील वारकरी संप्रदायाला प्रवास करण्यासाठी चारचाकी वाहन उपलब्ध करुन दिले. या वाहनाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेंगुर्ला येथे करुन हळवल वारकरी संप्रदायाला शुभेच्छा देत अभिनंदन केले.