– डॉ. सविता देवकर यांनी केली औषधाची निर्मिती
– 21 दिवस उंदरावर केला यशस्वी प्रयोग
नागपूर :- जगभरात जितक्या वेगाने प्रगती होत आहे त्याच वेगाने कर्करोग (कॅन्सर) आपले पाय पसरत आहे. कर्करोग हा एक गंभीर आजार असून दरवर्षी या आजारामुळे जगात लाखो लोकांचा बळी जात आहे. कॅन्सर आजारावर औषध काढण्यासाठी अनेक वैज्ञानिक आणि संशोधक प्रयत्न करीत आहे. सध्याच्या काळात कॅन्सरचे 200 पेक्षा जास्त प्रकार असल्याने कोणत्याही व्यक्तीला हा आजार होऊ शकतो. जगात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या कोलोरेक्टल किंवा कोलोन कॅन्सर (आतड्याचा कर्करोग) या आजारावर यशस्वी निदान करण्याचे संशोधन महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) डॉ. सविता श्रीकांत देवकर यांनी केले. ‘महाज्योती’ मार्फत ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांना विद्यावेतनातून त्यांना अर्थसहाय्याचे पाठबळ देत आहे. निगडी येथील प्रोगेसिव एज्युकेशन सोसायटीच्या मॉर्डन कॉलेज ऑफ फार्मसीमधील प्राध्यापिका डॉ. करीमुन्निसा शेख यांच्या मार्गदर्शनात डॉ. देवकर यांनी आपला प्रबंध 4 वर्षात यशस्वी पूर्ण केला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा अंतर्गत डॉ. देवकर यांचा पीएचडीचा विषय ‘फॉर्म्युलेशन अॅण्ड इव्हालूशन ऑफ टार्गेटेड ड्रग्स डिलीवरी सिस्टम ऑफ पोटेंशनल ड्रग्स फॉर इट्स एंटी कॅन्सर इफेक्ट’ असा होता. यासाठी औषधाच्या डिझाईन केलेल्या नॅनो पार्टीकल्स द्वारे कोलन कॅन्सर आजारावर प्रभावी ओरल टार्गेटेड कॅप्सूल औषध तयार केले.
मुळच्या पुण्यात राहणाऱ्या डॉ. देवकर यांनी एम. फार्म केल्यानंतर 2021 मध्ये पीएचडीचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी विद्यावेतन मिळविण्यासाठी महाज्योतीकडे अर्ज केला. महाज्योतीकडून दरमाह 35 हजार विद्यावेतन मिळाल्यानेच चार वर्षात डॉ. देवकर यांनी आपला शोध प्रबंध यशस्वी पूर्ण केले. मोठ्या आतड्याचा कॅन्सर हा मोठे आतडे किंवा गुदाशयात उद्भवतो. हे सहसा पॉलीप म्हणून दिसून येते, कोलन किंवा गुदाशयच्या आतील अस्तरावरील पेशींचा एक छोटा समूह कालांतराने कर्करोगात विकसित होऊ लागतो. चार वर्ष प्रामाणिक पणे अभ्यास करून डॉ. देवकर यांनी कोलन कॅन्सर आजाराची ओरल टार्गेटेड कॅप्सूल तयार केली. त्यांनी 21 दिवस उंदरावर तयार केलेली औषध दिल्यानंतर 85 ते 90 टक्के सकरात्मक परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. आता डॉ. देवकर या ओरल टार्गेटेड कॅप्सुल औषधाचे पुढे क्लिनिकल स्टडीसाठी प्रयत्न करीत आहे. डॉ. सविता देवकर यांनी महाज्योतीमुळे मिळालेल्या विद्यावेतनाबद्दल आभार मानले आहे.
संशोधकांची भरीव कामगिरी ही देशाला प्रगतीपथावर नेणार – राजेश खवले
‘महाज्योती’मार्फत ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांना विद्यावेतनातून त्यांना अर्थसहाय्याचे पाठबळ देण्याचे मोलाचे कार्य करीत आहे. त्यामुळेच आज जगात कोलन कॅन्सर सारख्या मोठ्या आजारावर औषधाची संजिवनी देणाऱ्या डॉ. सविता देवकर या महाज्योतीच्या विद्यार्थीनी ठरणे हे अभिमानास्पद आहे. त्यांनी महाज्योतीसह देशाचे नावलौकिक करण्याचे काम केले आहे. महाज्योतीकडून मिळणाऱ्या विद्यावेतनातून राज्यातील हजारो विद्यार्थी हे प्रगती पथावर गेले आहे. महाज्योतीने आता ज्युनिअर रिसर्च फेलोशिप (जेआरएफ) मध्ये 37 हजार रूपये व सीनियर रिसर्च फ़ेलोशिप (एसआरएफ) करिता 42 हजार रूपये प्रतिमाह दराने अधिछात्रवृत्तीची रक्कम तसेच घरभाडे भत्ता 30 टक्के, 20 टक्के व 10 टक्के या सुधारित दराने देण्यात येत आहे. पीएचडी संशोधकांची भरीव कामगिरी ही देशाला प्रगतीपथावर नेणार, असे महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले म्हणाले.