– राखेच्या प्रमाणात वाढ होत आहे
नागपूर :-कोराडी औष्णिक विद्युत केंद्राच्या परिसरात तसेच आजूबाजूच्या प्रकल्पबाधित गावांमध्ये प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पिंपळ वृक्ष लावण्याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे भुषण चंद्रशेखर यांनी कोराडी वीज केंद्राचे मुख्य अभियंता यांना निवेदन दिले आहे.
वाढते प्रदूषण यामुळे कोराडी वीज केंद्राच्या परिसरातील गावांना मोठ्या प्रमाणावर तापमान वाढ या समस्येला सामोरे जावे लागत आहे. तापमान वाढीमुळे नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. जर या समस्या रोखण्यासाठी योग्य वेळी प्रयत्न केले नाही तर पुढे या समस्या सोडवणे खूप अवघड होऊन जाईल. पर्यावरण संतुलन व्यवस्थित राहिले तरच आपले जीवनही व्यवस्थित चालेल त्यासाठी आपल्याला प्रदूषण कमी करण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. याकरिता मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन पूरक पिंपळाची झाडे लावणे आवश्यक आहे. असे भुषण चंद्रशेखर यांनी सांगितले.
पिंपळाची उंची १० ते १५ मीटरपर्यंत वाढते. याची फळे अतिशय लहान नळीच्या आकाराची असतात. ही पिकलेली फळे पक्ष्यांना खूप आवडतात. ही फळे पचण्यास कठीण असतात. न पचलेल्या फळांच्या बिया, पक्ष्यांच्या विष्ठेमार्फत इतरत्र पडून सहज उगवतात. पिंपळ वृक्ष भोवतालचे वातावरण शुद्ध करतो. हा कोठेही, कसाही वाढणारा वृक्ष असल्यामुळे तो मोकळ्या जागेत लावणे सोयीस्कर आहे.
वैज्ञानिक दृष्टीकोनातूनही पिंपळाचे झाड खूप उपयोगी मानले जाते. सर्वसाधारणपणे झाडे दिवसा ऑक्सिजन आणि रात्री कार्बनडायऑक्साइड सोडतात. वैज्ञानिकांच्या शोधानुसार हे एकमेव असे झाड आहे, जे दिवसरात्र २४ तास ऑक्सिजन देते. या झाडाच्या जवळपास राहणाऱ्या व्यक्तीची प्राणशक्ती वाढते.
पिंपळ हे वृक्ष वातावरणातील कार्बन डाइऑक्साइड शोषून घेतात व जीवनावश्यक अक्सिजन मोठ्या प्रमाणात प्रदान करतात.
वातावरणातील हवा स्वछ करण्यात पिंपळ वृक्ष खूप महत्वाची भूमिका बजावतात. हे वृक्ष पर्यावरण संतुलन राखण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतात. प्रदूषणाची समस्या वीज केंद्रासमोर उभी आहे. पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी जास्तीत जास्त पिंपळ झाडाचे वृक्षारोपण करण्याचा संकल्प प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे. प्रदूषण कमी करण्यास हातभार लावलाच पाहिजे. असे आवाहन भुषण चंद्रशेखर यांनी केले आहे.
कारखान्यांमधून निघणाऱ्या धुरामध्ये अनेक असे वायू असतात जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतात. वीज केंद्राच्या अजूबाजूला तसेच परिसरात पिंपळ वृक्ष लावल्यास जमिनीची होत असलेली धूप थांबविण्यास मदत होईल. हे वृक्ष हवाही स्वछ करतात.
“राज्यात कोराडी,खापरखेडा,चंद्रपूर, भुसावळ,पारस, परळी, नाशिक या औष्णिक वीज केंद्र परिसरात प्रदूषण ही समस्या दिवेसंदिवस वाढतच आहे. लोक प्रदूषणाला आणि त्याच्या परिणामाला गांभीर्याने घेत नाही. वीज केंद्रांनी पिंपळाचे झाड लावण्याचा संकल्प केल्यास पर्यावरणाला प्रदूषणापासून वाचविण्यास मदत होईल.”
– भुषण चंद्रशेखर जिल्हा उपाध्यक्ष, नागपूर (ग्रा)राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
@ फाईल फोटो