महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक स्पर्धांचे उद्घाटन
नागपूर : क्रीडा क्षेत्राकडे करियरच्या दृष्टीने बघावे व क्रीडा क्षेत्रात जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.
महाराष्ट्रात प्रथमच आयोजित महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक स्पर्धेतील नागपूर जिल्ह्यातील बैडमिण्टन, हॅण्डबॉल, नेटबॉल व सेपक टेकरा अशा एकूण 4 क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन 5 जानेवारीला जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
उत्कृष्ट आयोजनाबद्दल नागपूर क्रीडा विभागाचे अभिनंदन करुन खेळाडूंना शुभेच्छा देतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, खेळ भावना महत्वाची असून या स्पर्धेतून ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेण्यासाठी सराव होणार आहे. खेळाडूंनी जिल्ह्याचा नावलौकीक करावा, असे आवाहन त्यांनी केले.
ऑलिम्पिक स्पर्धांच्या माध्यमातून खेळाडूंना एक नवीन व्यासपीठ मिळाले असून खेळाडूंनी या संधीचे सोनं करायला हवं, असे आवाहन महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले.
2 ते 12 जानेवारी या कालावधीत सुरु असलेल्या एकूण 39 क्रीडा प्रकारामध्ये या स्पर्धा होत असून पुणे जिल्ह्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी, बारामती तालुक्यात ए.एस.आप गोरपडी, पुना कल्ब येथे तसेच राज्यात इतर जिल्ह्यात ज्यात नागपूर ,नाशिक ,जळगाव, औरंगाबाद, अमरावती, सांगली व मुंबई याठिकाणी महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक स्पर्धा 2023 चे आयोजन संपन्न होणार होत आहे. पुणे येथे शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे 5 जानेवारीला मुख्य स्पर्धेचे उद्घाटन झाले.
यावेळी कार्यक्रमाची प्रारंभ स्वरसंगम सांस्कृतिक ग्रुप नागपूरद्वारा गणेश वंदनेने स्वागत करण्यात आला. सोबतच ग्रुपने वंदेमातरम या गाण्यावर शास्त्रीय नृत्याचे सादरीकरण केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा विभागाचे उपसंचालक शेखर पाटील यांनी केले तर मान्यवरांचे आभार जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांनी मानले.
याप्रसंगी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे निरिक्षक राजाराम राऊत, महाराष्ट्र राज्य नेटबॉल व सेपक टेकरा संघटनेचे अध्यक्ष विपीन कामदार महाराष्ट्र राज्य हॅण्डबॉल संघटनेचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, महाराष्ट्र राज्य सेपक टेकरा संघटनेचे सचिव योगेंद्र पांडे, महाराष्ट्र राज्य हॅण्डबॉल संघटनेचे संयोजक रणधीर सिंग, जिल्हा हॅण्डबॉल संघटनेचे सचिव सुनिल भोतमांगे, महाराष्ट्र राज्य नेटबॉल संघटनेचे सचिव ललित जिवाणी, जिल्ह्यातील शिव छत्रपती पुरस्कारार्थी, आंतरराष्ट्रीय खेळाडू तसेच स्पर्धेकरीता राज्यातून विविध जिल्ह्यातून आलेले खेळाडू ,मुले-मुली व त्यांचे क्रीडामार्गदर्शक, संघव्यवस्थापक व जिल्ह्यातील क्रीडा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
नागपूर येथील चार स्पर्धांचे आयोजन : बॅडमिंटन व हँडबॉल -विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथे, नेटबॉल – विवेकानंद हॉल, साई मंदिरजवळ, वर्धारोड, नागपूर येथे तर सेपक टेकरा या स्पर्धेचे आयोजन संत तुकडोजी महाराज क्रीडा संकुल, कॉटन मार्केट रोड, नागपूर येथे करण्यात आले आहे. क्रीडा प्रेमींनी या स्पर्धाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांनी केले आहे.