– नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाला मिळणार गती
नागपूर :- नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाला गती देण्याच्या दृष्टीने महत्वाचा पुढाकार घेण्यात आला आहे. प्रकल्पासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्त टाटा कन्सलटन्सी इंजिनिअर्स लिमिटेड यांच्यासोबत नागपूर महानगरपालिकेद्वारे गुरूवारी (ता.२६) करारनामा करण्यात आला. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी व टाटा कन्सलटन्सी इंजिनिअर्स लिमिटेडचे सीनियर व्हॉईस प्रेसिडेंट बी.आर. पार्थसारथी यांनी करारनाम्यावर स्वाक्षरी केली.
मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीमध्ये आयुक्त कक्षात हा करारनामा झाला. याप्रसंगी सार्वजनिक अभियांत्रिकी विभागाच्या अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, उपविभागीय अभियंता राजेश दुफारे, सहायक अभियंता रवी मांगे, तांत्रिक सल्लागार मोहम्मद इसराईल, टाटा कन्सलटन्सी इंजिनिअर्स लिमिटेडचे असोसिएट व्हॉईस प्रेसिडेंट जी.एच. विरुपक्षा, उपमहाव्यवस्थापक सुदील मनी उपस्थित होते.
नागनदी प्रदूषणमुक्त प्रकल्पाला राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालय (एनआरसीडी)कडून ३ सप्टेंबर रोजी मंजुरी प्रदान झाली. यानंतर मनपाद्वारे निविदा मागवून प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (पीएमसी) म्हणून टाटा कन्सलटन्सी इंजिनिअर्स लिमिटेड या कंपनीची (संयुक्त उपक्रमाच्या माध्यमातून) नियुक्ती करण्यात आली. गुरूवारी (ता.२६) मनपा, एनआरसीडी आणि टाटा कन्सलटन्सी इंजिनिअर्स यांच्यात संयुक्त करारनाम्यावर स्वाक्षरी करण्यात आली. नागपूर शहराचे वैभव असलेल्या नाग नदीला प्रदूषणमुक्त करण्याचा १ हजार ९२७ कोटींचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून ८ वर्षांमध्ये प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र नागपूर महानगरपालिकेद्वारे पाच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. या प्रकल्पासाठी ६० टक्के निधी केंद्र सरकार, २५ टक्के निधी राज्य सरकार आणि १५ टक्के निधी नागपूर महानगरपालिकेकडून मिळणार आहे. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात यासाठी ५०० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली.
नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया जानेवारी २०२४ पासून सुरू झाली. यासाठी चार नावे निवडण्यात आली. यापैकी दोन संस्थांनी निविदा सादर केल्या. निविदांचे तात्रिक मूल्यांकन केल्यानंतर एनआरसीडीकडून एप्रिल महिन्यात मान्यता देण्यात आली. त्यानंतर मनपाद्वारे आर्थिक मूल्यांकन करुन टाटा कन्सलटन्सी इंजिनिअर्स लिमिटेड यांची पीएमसी अर्थात प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती केली.
नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प एनआरसीडी कन्सलटन्सी महानगरपालिका आणि टाटा इंजिनिअर्स लिमिटेडच्या माध्यमातून साकारला जाणार असून मुंबई येथील एनजेएस इंजिनिअर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी.टी.आय. इंजिनिअरिंग इंटरनॅशनल कंपनी लिमिटेड, जपान आणि ईपीटीआयएसए स्पेन, मेसर्स टी.सी.ई. लि. यांना संयुक्त उपक्रम म्हणून नेमण्यात आले आहे.