खासदार क्रीडा महोत्सव २०२३
नागपूर :- कोणत्याही स्पर्धेत सहभागी होणे हे प्रत्येक खेळाडूसाठी महत्वाचे असते. स्पर्धेतील सहभाग आणि प्रदर्शनातून खेळाडूला प्रोत्साहन मिळते आणि कामगिरी सुधारण्याची संधी देखील मिळते. नागपूर शहरात स्थानिक स्तरावर खासदार क्रीडा महोत्सवासारखे भव्य आयोजन होणे ही क्रीडापटूंसाठी पर्वणी असून खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी देशात सर्वत्र स्थानिक स्तरावर अशा महोत्सावांचे आयोजन गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी आंतराष्ट्रीय ॲथलिटी शायनी विल्सन यांनी केले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात होत असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत आयोजित ॲथलेटिक्स स्पर्धेच्या समारोपीय कार्यक्रमासाठी त्या नागपूरात आलेल्या होत्या. याप्रसंगी ‘मीट द प्रेस’मध्ये पत्रकारांशी त्या बोलत होत्या. याप्रसंगी खासदार क्रीडा महोत्सवाचे सचिव डॉ. पीयूष आंबुलकर, नागपूर जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे सचिव डॉ. शरद सूर्यवंशी, अश्फाक शेख आदी उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय स्तरावर ७५ वेळ देशाचे प्रतिनिधित्व करणा-या आणि ऑलिम्पिकच्या उपांत्यफेरीत प्रवेश करणा-या पहिल्या भारतीय ॲथलिट शायनी विल्सन यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेचे कौतुक करीत स्थानिक स्तरावरील प्रतिभावंत खेळाडू पुढे येण्यासाठी अशा व्यासपीठांची आवश्यकता असल्याचे नमूद केले. आधीच्या तुलनेत अनेक पटींनी आज ॲथलेटिक्समध्ये सुधारणा झालेल्या आहेत. नागरिकांमध्येही खेळाप्रति जागरूकता दिसून येत आहेत. पालक मुलांना खेळण्यासाठी प्रोत्साहित करून त्यांना उत्तम प्रशिक्षण मिळावे यासाठी पुढे पाठवित आहेत, ही आनंदाची बाब असल्याचे त्या म्हणाल्या.
पी.टी. उषा यांच्याकडे इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. ऑलिम्पिकमध्ये भारताला ॲथलेटिक्समध्ये एकेकाळी एकही पदक नव्हते मात्र आता सुवर्ण पदक येउ लागलेत ही बाब सुखद असून पुढील काळात पदकांची संख्या वाढेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. २०३६ साली भारताकडे ऑलिम्पिकचे यजमानपद असल्याबाबत बोलताना त्या म्हणाल्या, यापूर्वी भारताने आशियाई स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा, बुद्धिबळ ऑलिम्पियाडचे यशस्वी आयोजन केले आहे. त्यामुळे येत्या काळात ऑलिम्पिकचेही भारत यशस्वीरित्या आयोजन करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाची ध्वजवाहक म्हणून मिळालेला मान हा संपूर्ण कारकिर्दीतील अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.