मुंबई :- बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे जिवंत सातबारा मोहिम यशस्वीपणे राबविण्यात येत असून आता याची दखल घेऊन ही मोहीम संपूर्ण राज्यभर राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, अशी माहिती महसूल मंत्री यांनी विधान परिषदेत दिली.
महसूल मंत्री बावनकुळे यांनी या निवेदनात म्हटले आहे की, या मोहिमेअंतर्गत मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदी अभिलेखामध्ये (सातबारा) अद्ययावत केल्या जातील. यामुळे शेतीशी संबंधित वारसांच्या दैनंदिन कामांमध्ये येणाऱ्या अडचणींवर प्रभावी उपाययोजना होणार आहे. बुलढाणा जिल्ह्यात 1 मार्च 2025 पासून सुरू झालेल्या या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर 19 मार्च 2025 रोजी राज्य शासनाने शासन निर्णयाद्वारे ही मोहीम सर्व जिल्ह्यांमध्ये राबवण्याचा आदेश काढला आहे.
राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ही मोहीम 1 एप्रिल 2025 पासून सुरू होईल आणि साधारणतः दीड महिन्यांच्या कालावधीत संपूर्ण राज्यातील मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदी अद्ययावत करण्याचे उद्दिष्ट आहे. महसूल मंत्री बावनकुळे यांनी यावेळी सर्व सदस्यांना आवाहन केले की, त्यांनी आपआपल्या भागात तहसीलदार व एसडीओंच्या बैठकीद्वारे या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा.