नागपूर :- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम.किसान) योजनेच्या 15 व्या हप्याचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी तातडीने ई-केवायसी करावी. तसेच बॅक खाते आधार कार्डाशी जोडावे, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक राजेंद्र साबळे यांनी केले आहे. यासाठी येत्या 15 ऑगस्टपर्यंत ग्रामस्तरावर विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
पी.एम.किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबास रुपये 2 हजार प्रती हप्ता याप्रमाणे प्रतीवर्षी लाभ देण्यात येतो. महाराष्ट्र शासनाने याच धर्तीवर ‘नमो शेतकरी सन्मान निधी’ योजना राबविण्यास मान्यता दिली आहे. योजनेच्या 15 व्या हप्त्याचा लाभ ऑगस्ट ते नोव्हेंबर 2023 दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी बॅक खाते आधार क्रमांकाशी जोडणे व केवायसी प्रमाणिकरण करणे बंधनकारक आहे. याकामी सुलभता येण्यासाठी 7 ते 15 ऑगस्ट 2023 दरम्यान गाव पातळीवर विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत शेतकऱ्यांचे खाते असलेल्या बॅकेत आधार कार्ड जोडण्याचे व इंडियन पोस्ट पेमेंट बॅकेत विनामुल्य बॅक् खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
पी.एम.किसान केवायसी प्रमाणिकरणासाठी पी.एम.किसान पोर्टलवरिल ( https://pmkisan.gov.in/ ) फार्मर कॉर्नरवर जावून मोबाईलवर येणाऱ्या ओटीपीच्या आधारे लाभार्थी स्वत: केवायसी करु शकतात. तसेच नजीकच्या सामाईक सुविधा केंद्रावर (सीएससी) जावून केवायसी करु शकतात. केंद्र शासनाने PMKISAN GOI हे ॲप गूगल प्ले स्टोअर वर उपलब्ध करुन दिले आहे. या ॲपवर फेस ऑथेंटिकेश द्वारे लाभार्थींना केवायसी करता येणार आहे.