स्वामी विवेकानंद यांच्याप्रमाणे नरेंद्र मोदी यांनी जगाचा भारताप्रती दृष्टिकोन बदलला : राज्यपाल रमेश बैस

मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यकाळात एकाच वेळी अनेक क्रांतीकारी उपक्रमांची सुरुवात केली आहे. त्यांनी ४७.८ कोटी लोकांचे जनधन बँक खाती सुरु करून एक अभेद्य जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथील विश्वधर्म संमेलनातील भाषणातून जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला होता; त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी, या दुसऱ्या नरेंद्र यांनी, जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असून आज आपण भारतीय आहोत याचा प्रत्येकाला अभिमान वाटतो, असे उद्गार महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे काढले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रेडिओवरील ‘मन की बात’ या जनसंवादाच्या शंभराव्या भागाच्या सामुहिक प्रदर्शनानंतर राजभवन येथे झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल बैस बोलत होते.

यावेळी हिवरे बाजारचे माजी सरपंच पोपटराव पवार, मधुमेह विशेषज्ञ व कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी, ‘डिक्की’चे संस्थापक मिलिंद कांबळे, भरडधान्य उद्योजिका व प्रचारक शर्मिला ओस्वाल, राज्यातील अनेक पद्म पुरस्कार विजेते, ‘मन की बात’ कार्यक्रमांमध्ये पंतप्रधानांनी उल्लेख केलेले राज्यभरातील युवक, विद्यार्थी व नागरिक हे विशेष निमंत्रित म्हणून कार्यक्रमाला उपस्थित होते.

यावेळी चित्रपट सृष्टीतील माधुरी दीक्षित, शाहीद कपूर, एकता कपूर, रोहित शेट्टी, सोनू निगम, प्रसाद ओक, शैलेश लोढा, अनुराधा पौडवाल आदी उपस्थित होते.

भारत लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश झाला असल्याचे सांगून या लोकसंख्येचा देशाला फायदा व्हावा या दृष्टीने पंतप्रधानांनी युवकांच्या कौशल्य विकासासाठी स्किल, रिस्कील व अपस्कीलचा मंत्र दिला आहे असे राज्यपालांनी सांगितले.

‘मन की बात चे दिनांक ३ ऑक्टोबर २०१४ रोजी पहिल्यांदा रेडिओवरून प्रसारण झाल्यापासून पंतप्रधान मोदी यांनी सदर कार्यक्रमातून जनसामान्यांच्या प्रश्नांवर चर्चा केली, असे सांगताना देशाला नरेंद्र मोदी हे पंतप्रधान लाभले हे देशाचे सौभाग्य आहे असे राज्यपालांनी सांगितले.

स्वच्छ भारत, बेटी बचाओ – बेटी पढ़ाओ, पाण्याची बचत, स्थानिक उत्पादनांचा आग्रह, खादी, भारतीय खेळण्यांचा उद्योग, आरोग्य क्षेत्रातील स्टार्टअप्स, आयुष तसेच अंतराळातील प्रगती यांसह अनेक विषयांवर मोदी यांनी ‘मन की बात’ मधून भाष्य केले. संवादात्मक शैलीमुळे पंतप्रधान मोदी ‘परीक्षेवर चर्चा’ कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी व युवकांपर्यंत पोहोचले, असे राज्यपालांनी सांगितले.

मन की बात ही खऱ्या अर्थाने लोकांची विकासाची चळवळ झाली आहे असे सांगून मन की बात चा शंभरावा भाग ही देशाच्या स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षाची सुरुवात असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

सुरुवातीला केंद्रीय संचार ब्युरो यांनी ‘मन की बात’ मधील भागांवर आधारित मांडलेल्या प्रदर्शनाला राज्यपालांनी भेट दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आज १ मे ला ' बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना 'चे उद्घाटन

Mon May 1 , 2023
रामटेक :- आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नागपूरच्या वतीने रामटेकच्या गांधी चौक स्थित सुतीकागृह येथे ‘ हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ‘ कार्यान्वित झाले असुन उद्या दिनांक १ मे रोजी सकाळी १० वाजता अॅड. आशिष जयस्वाल, आमदार विधानसभा क्षेत्र रामटेक यांच्या प्रमुख उपस्थितीत एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते आपला दवाखाना केंद्राचे व्हिडओ कॉन्फरन्सद्वारे उद्घाटन करण्यात येणार आहे. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com