नागपुर – प्रहार समाज जागृति संस्था गेल्या २८ वर्षापूर्वी नागपुरातील तसेच विदर्भातील जास्तीत जास्त संख्येने तरुण तरुणी भारतीय सैन्यात अधिकारी व्हावे या उद्देशाने कार्यरत आहे व याच हेतूने प्रहार डिफेन्स अकॅडेमीची स्थापना झालेली आहे. या अकॅडेमीत सैनिकी अधिकाऱ्यांनी यावे त्यांचे अनुभव ,कामगिरी व शौर्य प्रहारच्या विद्यार्थ्यांना सांगून त्यांना मार्गदर्शित करावे व सैन्यात जायला प्रोत्साहित करावे या उदात्त विचाराने प्रहार संस्था नेहमीच सैनिकी अधिकाऱ्यांची भेटी ठरवत असते.
नुकतेच भारतीय नौसेनेतील निवृत्त लेफ्टनंट कमांडर गुलबाक्षी काळे यांनी प्रहार डिफेन्स अकॅडेमीला भेट दिली व सर्व प्रहारींशी संवाद साधला. त्यांनी प्रहारींना भारतीय नौसेनेतील निवड, प्रशिक्षण,धाडसी कारवाया व सर्वांग सुंदर परिपूर्ण जीवन याबद्दल विस्तारपूर्वक माहिती दिली.
त्यांनी तरुण प्रहारींना बघून उत्साहित होत भारतीय नौसेनेतील अधिकाऱ्यांचे आयुष्य उलगडून दाखविले. प्रहारींनासुद्धा हि सर्व माहिती ऐकून उत्सुकतेने लेफ्टनंट कमांडर गुलबाक्षी काळे यांना बोलते केले व आपापल्या प्रश्नांचे निरसन केले.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रहार समाज जागृति संस्थेच्या संस्थापक विश्वस्त फ्लाईट लेफ्टनंट शिवाली देशपांडे यांनी लेफ्टनंट कमांडर गुलबाक्षी काळे यांना प्रहारचे स्मृतिचिन्ह व प्रहार कॅप देवून सन्मानित केले. प्रहारी अश्विन हुमणे यांनी आभार मानले व प्रहारी अमोघ पांडे याने या कार्यक्रमाचे सुंदर संचालन केले.
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने प्रहारी उपस्थित होते.