अमरावती :-‘एलजीबीटीक्यूआयए+’ समुदायाला आपल्या प्रमाणेच समजणे आवश्यक आहे. त्यांना वेगळे मानून त्यांच्याशी वर्तन करण्याने त्यांच्या मानवाधिकाराचे हनन होते. ते सुद्धा आपले सारखीच माणसे असतात. त्यांच्याशी माणूसकीचा व्यवहार वाढावा म्हणून कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सांस्कृतिक अशा विविध पातळयांवर कार्य करणे आवश्यक आहे, असे मत समर्पण ट्रस्टच्या संचालक हेमंतकुमार टोकशा यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. वैशाली गुडधे यांनी केले. यावेळी त्या म्हणाल्या, आजही जन्माला येणारे अपत्य मुलगा किंवा मुलगीच असले पाहिजे, ते जर यांपैकी नसेल, तर अशा अपत्याला स्वीकारण्याची मानसिकता समाजात अद्यापही फारशी दिसून येत नाही. ही स्थिती बदलण्यासाठीआणि लिंगभाव संवेदनशीलतेचा विकास करण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. भगवान फाळके यांनी केले.
कार्यक्रमाला विद्यापीठातील विविध शैक्षणिक विभाग आणि संलग्नित महाविद्यालयांचे विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक यांसह सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चर्चक आणि सहभागी यांच्यातील खुल्या संवादामुळे परिसंवाद अधिक परिणामकारक झाला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सेंटरमधील कर्मचाऱ्यांनी जबाबदारी पार पाडली.