– स्वच्छ भारत अभियानांतर्गत ‘संकल्प स्वच्छतेचा’ स्पर्धेची बैठक
नागपूर :- नागपूरला स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ शहर साकारण्यासाठी पुढे येत नागरिकांनी स्वच्छता स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेत नागपूरला स्वच्छ भारत अभियानाच्या अव्वल स्थानी पोहोचविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी केले.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेद्वारा ‘संकल्प स्वच्छतेचा’ या स्वच्छता विषयक विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेची माहिती सर्व सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावी आणि स्पर्धेत त्यांच्या बहुमूल्य सूचना घेता याव्या, याकरिता मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभापती सभागृहात विविध संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. याप्रसंगी नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त रवींद्र भेलावे, उपायुक्त अशोक पाटील, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले, सहाय्यक आयुक्त किरण बगडे, प्रकाश वराडे, अशोक पाटील, हरिष राऊत, विजय हुमणे, गणेश राठोड, शिक्षणाधिकारी राजेंद्र पुसेकर, डॉ विजय जोशी, स्वच्छ भारत मिशन नागपूरचे ब्रँड अॅम्बेसेडर उमेश चित्रिव, ब्रँड अॅम्बेसेडर किरण मुंदडा यांच्यासह सर्व झोन अधिकारी, मनपाचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी शहरातील विविध संघटनेचे पदाधिकारी, सदस्य व सर्वसामान्य नागरिक उपस्थित होते.
स्पर्धेविषयी माहिती देत अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी सांगितले की, स्वच्छ भारत अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेद्वारा ‘संकल्प स्वच्छतेचा’ या स्वच्छता विषयक विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले यात मुख्यतः ‘जिंगल,लघुपट (शॉर्ट मुव्हीस) भित्तीपत्रिका रेखाटन(पोस्टर्स ड्रॉइंग),भित्तीचित्रे (म्युरल्स),पथनाट्य (स्ट्रीट प्ले),भिंती रंगविणे (wallpainting) स्वच्छ शाळा, स्वच्छ हॉटेल, स्वच्छ रुग्णालय,स्वच्छ आरडब्ल्यूए, स्वच्छ मोहल्ला, स्वच्छ बाजारपेठ, स्वच्छ वॉर्ड यांचा समावेश आहे. या स्पर्धांच्या माध्यमातून नागपूरकरांना आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळाली आहे. या विविध स्पर्धांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ नोव्हेंबर 2022 असून, या संदर्भातील सविस्तर माहिती https://bit.ly/3tnZjEK या लिंकवर उपलब्ध आहे. तरी नागरिकांनी मोठ्या संख्येत स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन जोशी यांनी केले आहे.
बैठकीदरम्यान नागरिकांनी आपले विविध मत मांडले त्यावर अतिरिक्त आयुक्त राम जोशी म्हणाले की, स्वच्छतेसंदर्भात नागपूर महानगरपालिकेतर्फे विविध पाऊल उचलल्या जात आहे. तरी स्वच्छता ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, आपले शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वानी पुढे येऊन काम करायला हवे, स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ बनविण्यासाठी स्वच्छतेचा संकल्प करायला हवा.