– शहरातील वारसास्थळांची मनपाद्वारे स्वच्छता
नागपूर :- स्वच्छता ही जीवनाचा अविभाज्य गरज आहे. अस्वच्छतेमुळे प्रदूषण वाढते आणि प्रदूषणामुळे माणसाचे आयुर्मान कमी होते. त्यामुळे जीवनात सदैव स्वच्छतेचे अनुकरण करण्याची प्रतिज्ञा घेऊया, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरकरांना केले.
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार नागपूर शहरात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप झाला. ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाच्या माध्यमातून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त बुधवारी २ ऑक्टोबर रोजी नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरातील विविध वारसास्थळांची सफाई अभियान राबविण्यात आले. या अंतर्गत कस्तुरचंद पार्क येथील स्वच्छता अभियान कार्यक्रमात आयोजित श्रमदान कार्यक्रमात ते बोलत होते.
मंचावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, केंद्रीय रिझर्व्ह पोलीस बल चे डीआयजी प्रशांत जांभुळकर उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मनपाच्या नवनिर्मित तीन स्मार्ट पब्लिक टॉयलेट आणि आरआरआर सेंटरचे लोकार्पण झाले.
पुढे बोलताना ना.गडकरी यांनी मनपाच्या ‘आरआरआर’ केंद्राच्या संकल्पनेचे कौतुक केले. टाकाऊ वस्तूंमधून अर्थाजन आणि त्यातून महिलांचे सक्षमीकरण ही मनपाची संकल्पना आदर्श ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. टाकाऊ पदार्थांपासून नवनिर्मिती करताना आता टायर तसेच प्लॉस्टिकचा काही अंशी डांबरामध्ये समावेश करून अधिक दर्जेदार रस्ते तयार करण्याचा मानस ना गडकरी यांनी व्यक्त केला. कचऱ्याच्या समस्येपासून सुटका मिळविण्यासाठी आता कचऱ्यातून इंधन निर्मितीच्या दिशेने काम सुरू असल्याचाही उहापोह त्यांनी केला. प्लास्टिकपासून टाईल्सची निर्मिती करून नागपूर महानगरपालिकेने त्याचा वापर सुरू करावा तसेच खर्रा, पान खाऊन रस्त्यांवर आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर मनपाने कठोर कारवाई करावी, अशी सूचनाही ना.नितीन गडकरी यांनी यावेळी केली.
प्रास्ताविकामध्ये मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाची संकल्पना विषद केली. या अभियानाच्या माध्यमातून १७ सप्टेंबरपासून २ ऑक्टोबर पर्यंत नागपूर महानगरपालिकेद्वारे विविध स्पर्धा, कार्यक्रम घेण्यात आले. गणेशोत्सवा दरम्यान पर्यावरणपूरक उत्सव साजरा व्हावा याकरिता प्रयत्न केले. स्वच्छतेप्रति जनतागृती करिता ‘स्वच्छता दौड’ घेण्यात आली. स्वच्छता कर्मचाऱ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. सफाई कर्मचाऱ्यांकरिता आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. शाळांमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना कचऱ्याचे वर्गीकरण, ‘आरआरआर’ चे महत्व पटवून देण्यात आले. ‘एक पेड माँ के नाम’ या मोहिमेद्वारे शहरातील ६ ते ७ ठिकाणी सुमारे ४० हजारावर झाडे लावण्यात आल्याचे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.
याप्रसंगी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले, उपायुक्त सर्वश्री मिलिंद मेश्राम, प्रकाश वराडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दिपक सेलोकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, सहायक आयुक्त सर्वश्री गणेश राठोड, हरीश राऊत, प्रमोद वानखेडे, नरेंद्र बावनकर, श्याम कापसे, कार्यकारी अभियंता सर्वश्री राजेंद्र राठोड, लोकेश बासनवार, ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनचे कौस्तभ चॅटर्जी, सुरभी जयस्वाल, तेजस्विनी महिला मंचच्या संचालिका किरण मुंधडा यांची संपूर्ण चमू तसेच उपद्रव शोध पथक, महिला बचत गट, केंद्रीय रिझर्व्ह पोलीस बल, वायुसेना, एनसीसी, विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी या अभियानात सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे संचालन मनपाचे जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांनी केले व शेवटी त्यांनी आभार देखील मानले.
वारसा स्थळांची स्वच्छता
नागपूर महानगरपालिकेद्वारा फ्रीडम पार्क परिसर , फ्रीडम पार्क ते झिरो माईल रोड, झिरो माईल परिसर, झिरो माईल ते आरबीआय चौक रोड, जीपीओ चौक परिसर, जीपीओ ते आकाशवाणी रोड, आकाशवाणी चौक परिसर, आकाशवाणी ते विधान भवन रोड, विधान भवन चौक परिसर, विधान भवन ते आरबीआय चौक रोड, एलआयसी चौक ते आरबीआय चौक रोड, एलआयसी चौक ते मोहिनी कॉम्प्लेक्स रोड, मोहिनी कॉम्प्लेक्स ते आरबीआय चौक रोड, लिबर्टी ते एलआयसी चौक रोड व ऐतिहासिक कस्तुरचंद पार्क येथे सर्व सहायक आयुक्त यांच्या नेतृत्वात स्वच्छता करण्यात आली.