नागपूर :- कोरोना काळात नागपूरकरांनी एकमेकांना उत्तम सहकार्य केले. देशाच्या विविध भागातून आपल्या घरी जात असताना नागपुरात मुक्कामी आलेल्या गरजू वाटसरूंना सर्व प्रकारची मदत केली आहे. लोकसहभागातून उत्तमरित्या कार्य कसे करावे हे नेहमीच नागपूरकरांनी संपूर्ण देशाला दाखवून दिले आहे. आता अशाच लोकसहभागातून क्षयरोगाला (टीबी) हद्दपार करण्याचा संकल्प करूया असे आवाहन नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी केले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत येत्या २०२५ पर्यंत ‘क्षयरोगमुक्त भारत’ करण्याचा निर्धार केला आहे. या अनुषंगाने क्षयरुग्णांना लागणाऱ्या पौष्टिक आहारासाठी नागरिकांनी, सामाजिक संस्थांनी क्षयरोग बाधित रुग्णांचे पालकत्व घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमांतर्गत माजी महापौर व विद्यमान आमदार प्रवीण दटके यांच्या नागपुरातील स्व. प्रभाकरराव दटके स्मृती सेवा प्रतिष्ठानने पुढील सहा महिन्यासाठी ६१ क्षयरोग बाधित रुग्णांचे पालकत्व स्वीकारले आहे. स्व. प्रभाकरराव दटके स्मृती सेवा प्रतिष्ठानने पुढील सहा महिन्यासाठी ६१ क्षयरोग बाधित रुग्णांचे पालकत्व स्वीकारले आहे. यानिमित्याने शनिवारी (ता२२) महाल स्थित स्व. प्रभाकरराव दटके स्मृती रुग्णालयात पौष्टीक आहार कीट वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. शिल्पा जिचकार, डॉ. सीमा कडू, गांधीबागचे झोनचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय तिवारी, स्व. प्रभाकरराव दटके स्मृती सेवा संस्थाचे अध्यक्ष डॉ. सुभाष राऊत, सचिव उमेश वर्जुरकर, हरीश महाजन, कार्याध्यक्ष विवेक धाक्रस यांच्यासह मनपाचे अधिकारी, संस्थेचे पदाधिकारी सदस्य व लाभार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना अतिरिक्त आयुक्त राम जोशी म्हणाले की, आपल्याला येत्या २०२५ पर्यंत क्षयरोगाला भारतातून हद्दपार करायचे आहे. यासाठी नागरिकांमध्ये क्षयरोगाबाबत जनजागृती करण्याची जबाबदारी मनपाने उचलली आहे. यासाठी विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने येत्या काही वर्षात नागपुरातला क्षयरोगमुक्त करण्याचा निर्धार महानगरपालिकेने केला आहे. क्षयरुग्णांना उत्तम औषध उपचाराच्या सुविधेसोबतच पोषण आहार मिळणे आवश्यक आहे. त्यांना उत्तम पौष्टिक आहार मिळाल्यास क्षयरोग बरा होऊ शकतो यासाठी नागरिकांनी व सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत क्षयरोग बाधित रुग्णांचे पालकत्व घ्यावे असे आवाहन श्री राम जोशी यांनी केले. यापूर्वीच मनपाच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्तिगत पणे एका तरी क्षय रुग्णाचे पालकत्व घ्यावे असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी केले असल्याचेही राम जोशी यांनी यावेळी सांगितले.
यावेळी मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार म्हणले की, क्षयरोग आजार झाला आहे किंवा नाही हे लवकर लक्षात येत नाही. आजार वाढल्यानंतर जेव्हा लक्षणे दिसू लागतात तेव्हा क्षयरोगाचे निदान होते. एकदा क्षयरोगाचे निदान झाले की ते योग्य उपचाराने बरे होते. त्यामुळे क्षयरोग झाले म्हणजे आयुष्य संपले, असा विचार कुणीही मनात आणू नये, पौष्टिक आहार घ्यावा, व्यसन करू नये, असे आवाहन डॉ. नरेंद्र बहिरवार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा जोशी यांनी केले.
पौष्टीक आहार कीटचे वितरण
क्षयरुग्णांना अतिरिक्त सहाय्य व पौष्टिक आहार मिळावे यासाठी राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत क्षयरोग बाधित रुग्णांचे पालकत्व घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत स्व. प्रभाकरराव दटके स्मृती सेवा संस्थेने पुढील सहा महिन्यासाठी ६१ क्षयरोग बाधित रुग्णांचे पालकत्व स्वीकारले आहे. अतिरिक्त आयुक्त राम जोशी आणि इतर मान्यवरांच्या हस्ते पौष्टीक आहार कीटचे वितरण करण्यात आले. यात शिधा, फूड बास्केट, अंडी, मिल्क पावडर व प्रोटीन पावडर आदी साहित्याचा समावेश होता.