नागपूर :- संपूर्ण देशभरात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान रक्तदान पंधरवड्याचे/ मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. याच अनुषंगाने सीजीएचएस अर्थात केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेतर्फे आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय नागपूरच्या रक्तपेढीद्वारे आज 26 सप्टेंबर रोजी सर्व केंद्रीय सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी नागपुरातील सेमिनरी हिल्स इथल्या सीजीएचएस वेलनेस सेंटर, टीव्ही टॉवर बस स्टॉपजवळ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले .एकूण 38 रक्तदात्यांनी या शिबिरात रक्तदान केले.
केंद्र सरकारच्या आरोग्य योजना, इंडियन ब्युरो ऑफ माइन्स, जीएसआय आणि इतर केंद्र सरकारच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी यात सहभाग घेतला. रक्तदान शिबिरात सीएचएस नागपूर कार्यालयातील डॉक्टर आणि कर्मचारी उपस्थित होते . या शिबीरात रक्तदान करणा-यापैकी इंडियन ब्युरो ऑफ माइन्सचे केतन गायकवाड यांनी 42 वेळा, सीजीएचएस नागपूरचे सोमवीर यांनी 27 वेळा तर सीजीएचएस नागपूरचे डॉ. अमित नाफडे यांन 24 वेळा या शिबीरापूर्वी रक्तदान केले होते.
रक्तदात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सेल्फी पॉइंटही या शिबीरस्थळी स्थापित करण्यात आला. या मोहिमेतील अमूल्य योगदानाबद्दल सर्व रक्तदात्यांना प्रशस्तीपत्रही देण्यात आले. रक्तदाना सारख्या समाजपयोगी कार्याबद्दल आणि शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांना प्रोत्साहित करून रक्तदानाची चळवळ अखंडपणे सुरू ठेवल्याबद्दल सीजीएचएस नागपूरच्या अतिरिक्त संचालिका डॉ.विजया मोटघरे आणि सीजीएचएस नागपूरच्या टीमचा सत्कार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर रक्तपेढीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला.