गडचिरोली :- अलीकडील काळातील कधी अतिवृष्टी तर कधी अनावृष्टी यामुळे पूर दुष्काळ या समस्यांचा सामना करावा लागत आहे, त्याचा शेतीवर विपरीत परिणाम होत असतो. नद्यांमधील गाळामुळे नदीची वाहन क्षमता, साठवण क्षमता घटली आहे. त्यामुळेच नदीला जाणून घेणे, तिचं स्वास्थ सुधारणे आणि तिच्या समस्यांचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने जलपुरुष राजेंद्र सिंग यांच्या संकल्पनेतून चला जाणूया नदीला या अभियानाची सुरुवात महाराष्ट्रामध्ये 2 ऑक्टोबर 2022 रोजी सेवाग्राम आश्रम वर्धा येथून झाली.
या अभियानांतर्गत प्रत्येक जिल्ह्यातून वाहणाऱ्या राज्यातील ७५ निवडक नद्यांबाबतची माहिती गोळा करणे, तिचा प्रचार प्रसार करणे नदी संवाद यात्रेचे आयोजन करणे, नदीला अमृतवाहिनी बनविणे, नदीचा तट आणि जैवविविधतेबाबत लोकांना जागृत करणे, पावसाचे पाणी अडवून नदीचा भूजल स्तर उंचावणे, नदीचे प्रदूषण रोखणे, तिच्यावर होणारे अतिक्रमण रोखणे, पर्जन्य नोंदी दुष्काळ पुराच्या नोंदी ठेवणे व नागरिकांच्या सहकार्याने नदीचा समग्र अभ्यास करण्याचे उद्देशाने या अभियानाची सुरुवात झालेली आहे .
राज्याला पूर आणि दुष्काळ मुक्त करण्यासाठी समाजाच्या सहभागाला पाठबळ देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. महाराष्ट्र सरकारच वन आणि सांस्कृतिक कार्य विभाग या कामी सहकार्य करीत आहे. राज्यातील विविध 75 नद्यांसाठी कार्यरत असलेले 110 जलनायक, जलप्रेमी, जलदूत या उपक्रमात सहभागी होणार आहेत. 15 ऑक्टोबर 2022 रोजी भारतरत्न डॉ.ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनी राज्यातील 75 नद्यांवर एकाच दिवशी नदी यात्रेला सुरुवात झाली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा 15 ऑक्टोबर 22 ला कठाणी नदीच्या जलांचे पूजन करून या नदी संवाद यात्रेचा शुभारंभ थाटामाटात संपन्न झालेला आहे. तसेच इतर नद्यांवरही खासदार अशोक नेते व इतर पदाधिकारी यांच्या उपस्थित नदी संवाद यात्रेमध्ये नदी अभ्यासक नदीप्रेमी शेतकरी विद्यार्थी नदीचे स्टेकहोल्डर, गुरुदेव ग्रामसेवक, सहभागी झाले. 26 जानेवारी 2023 पर्यंत नदीच्या सद्यस्थितीची माहिती संकलित करून नदीला अविरल निर्मल करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात येणार असून नदीयात्रेवेळी सरकारी यंत्रणेच्या अधिकारी आणि नदीशी निगडित समाजाच्या सहभागातून सद्यस्थितीची माहिती संकलित केली जाईल.
गडचिरोली जिल्ह्यातही या अभियानांतर्गत कठानी नदीचा अभ्यास करण्याकरता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ युथ वेलंफेअर संस्थेच्या नेतृत्वात कठानी नदीची निवड करण्यात आली आहे. या नदीचा अभ्यास करण्याकरिता दिनांक 14 ऑक्टोबर 2022 चा शासन निर्णय नुसार पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन अनुसार माननीय जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाणार असून या अभियानाचे नदी समन्वयक म्हणून मनोहर हेपट तथा सहसमन्वयक म्हणून उमेश माहरे यांची निवड करण्यात आली आहे.
कठानी नदी चे जलपूजन करून संवाद यात्रेचा शुभारंभ मोठ्या थाटामाटात संपन्न झाला आहे. गडचिरोली येथे संपन्न झालेल्या कठानी नदी संवाद यात्रेच्य शुभारंभ प्रसंगी या सोहळ्याचे साक्षीदार ठरले ते डॉ.श्रीराम कावळे प्र. कुलगुरू, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, आत्मा चे संचालक डॉ. कऱ्हाळे महेंद्र गणवीर तहसीलदार गडचिरोली, गणेश परदेशी उप. कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग, वामनराव सावसाकडे आणि कठानी नदी संवाद यात्रेचे समन्वयक मनोहर हेपट यांचे उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज भोगेवार यांनी केले तर आभार प्रदर्शन सहसमन्वयक उमेश महारे यांनी केले . यावेळी साक्षी रोडे हिने नदीचे महात्म्याबद्दल अभंग गाऊन कार्यक्रमाची उत्तम सुरुवात केली. तर भागवताचर्या विजयानंद रोडे महाराज यांनी जल व कलशाचे विधिवत पूजन केले व आपल्या वाणीमधून नदीचं महात्म्य विशद केले. या कार्यक्रमाला डॉ.शिवनाथ कुंभारे, पंडित पुडके सचिव गुरुदेव सेवा मंडळ, पांडुरंग घोटेकर अध्यक्ष जेष्ठ नागरिक संस्था हे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी जितेंद्र मुप्पिडवार, टिकाराम निलेकर ,राजू कर्मा, नंदनवार सर ,ग्रामगीताचार्य तुषार निकुरे, जोशी सर ,संजय भासारकर सर संजीवनी नर्सिंग स्कूल यांचे सहकार्य लाभले. यावेळी गडचिरोली व धानोरा तालुक्यातील सालेभट्टीी, ऊसेगाव गोगाव आणि जेप्रा येथील शेतकरी व नदीप्रेमी नागरिक व विद्यार्थी सहभागी झाले होते.