नागपूर :- थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या चिखलदराजवळील आमझरी आणि भीमकुंड येथे साहसी खेळाची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. जायंट स्वींग, झिप लाईनसह 400 मीटरवरील स्काय सायकलींग क्रीडा प्रकाराने युवा पर्यटकांना भूरळ घातली आहे. याठिकाणी असलेल्या उत्तम सुविधांमुळे वर्षभर पर्यटकांची गर्दी दिसून येत आहे.
चिखलदरापासून 5 किलोमीटर अंतरावर आमझरी मधाचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. अडीचशे लोकसंख्या असलेल्या गावाने मध उत्पादन वाढीसाठी विविध प्रयोग केले आहेत. पूर्वी विविध प्रजातींच्या आंब्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या आमझरी या गावात आजही अनेक जातींचे आंबे चाखायला मिळतात. आंब्यासोबतच रानमेव्यांमध्ये जांभुळ, मोहफुल हेही या गावाचे विशेष आकर्षण आहे. अशा विविध कारणासाठी प्रसिद्ध असलेल्या आमझरी गावात साहसी खेळांसाठी विशेष उपक्रम राबविण्यात आला आहे. यामुळे हे ठिकाणी दूरवर प्रसिद्धीस येत आहे.
वन विभागातर्फे सुमारे एक कोटी रूपये खर्चून पर्यटकांचे आकर्षण असलेल्या साहसी खेळांची व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. साहसी खेळ प्रकारात आमझरी येथे बंजी इजेक्शन, ह्युमन गायरो, 400 मीटर झिप लाईन, 250 मीटर स्काय सायकल, 40 फुट क्लायंबिंग वॉलची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच चिखलदारा येथील प्रसिद्ध असलेल्या भीमकुंड येथे 460 मीटर झिप लाईन, 400 मीटर स्काय सायकल, जायंट स्विंग तयार करण्यात आले आहे. येथे साहसी खेळांसाठीची नोंदणी ऑफलाईन आहे.
याठिकाणी पर्यटकांच्या सुविधेसाठी निवासाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी पाच एक्झीक्युटीव्ह टेंट, आठ टेंट, चार कॉटेजेस, 10 बेडची डॉरमेटरी, एक कॅन्टीन, 40 आसन क्षमतेचे एक ऑडीटोरीयम आदी सोयीसुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. यामुळे पर्यटकांना भोजन आणि निवासाची उत्तम व्यवस्था उपलब्ध होत आहे. मुक्कामासाठी magicalmelghat.in या वेबसाईटवर बुकींग करावे लागणार आहे. विशेष म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये उल्लेख केलेले प्रकाश होमस्टे आमझरी गावातच आहे.
सुमारे 10 हेक्टरवरील आमझरी साहसी खेळ प्रकल्पाला सन 2019-20 मध्ये सुरवात करण्यात आली. साधरणत: एक वर्षाच्या काळात प्रकल्प कार्यान्वित झाला. वर्षभर पर्यटकांचा ओघ या ठिकाणी असला तरी प्रामुख्याने पावसाळा आणि हिवाळ्यातील जुलै ते जानेवारी या कालावधीत मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेटी देत आहेत. प्रामुख्याने शालेय सहलींचे याठिकाणी मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात येते. पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेता भीमकुंड येथे यावर्षीपासून तीन साहसी क्रीडा प्रकार सुरू केले आहे.
जिल्हा नियोजन समितीचा निधी आणि सामाजिक उत्तरदायीत्वाच्या निधीतून हे क्रीडा प्रकार सुरू करण्यात आले आहेत. युवकांचे विशेष आकर्षण असलेल्या साहसी क्रीडा प्रकारामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. आमझरी येथे पर्यटकांना पोहोचायचे असल्यास चिखलदरा ते घटांग रस्त्याने जावे लागते. तसेच भीमकुंड हे आमझरीपासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावर आहे. याठिकाणी पर्यटकांनी भेटी द्याव्यात, साहसी क्रीडा प्रकारांची त्यांना माहिती व्हावी, यासाठी प्रशासनातर्फे विशेष पुढाकार घेण्यात येत आहे. याठिकाणी इतर उत्तम सुविधा निर्माण करण्यासाठी शासनामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत.