संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- तालुका विधी सेवा समिती कामठी यांच्या विद्यमाने पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयात विधी साक्षरता जनजागृती या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर सुधीर अग्रवाल, पर्यवेक्षक प्रा.व्ही बी. वंजारी उपस्थित होते. या कार्यक्रमाला कामठी बार असोसिएशनचे सचिव ऍड. डॉ विलास जांगडे, ऍड पंकज यादव, ऍड भीमा गेडाम, ऍड रीना गणवीर व विधी सेवा प्राधिकरणाच्या स्वयंसेविका अश्विनी रामटेके प्रामुख्याने उपस्थित होत्या.विद्यार्थ्यांमध्ये कायद्याची जागरूकता काळाची गरज’ या विषयावर विधी सेवा प्राधिकरणाच्या ऍड अश्विनी रामटेके यांनी विद्यार्थ्यांना उत्तम ज्ञान, मार्गदर्शन आणि जागरुकता दिली. महिलांवरील वाढते गुन्हे आणि मानवी हक्कांचे उल्लंघन लक्षात घेता कायद्याचे ज्ञान इतरांच्या मदतीशिवाय गरजूंना त्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यात मदत करेल, असे त्यांनी नमूद केले. आपल्या भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना न्यायालयातील वकिलांची मोफत कायदेशीर मदत आणि मोफत कायदेशीर जागृती यासह विविध योजना आणि सेवांची माहिती दिली.
तडजोडीच्या मार्गाने प्रकरणे निकाली काढण्यासाठी लोकअदालत आणि समझोता सदनच्या कार्याविषयीही त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. मोफत कायदेशीर मदत घेण्यासाठी कोणीही जिल्हा न्यायालयात जाऊ शकतो,असे त्यांनी सांगितले.याप्रसंगी ऍड विलास जाँगडे यांनी पोक्सो कायद्याची माहिती दिली.
पोक्सो कायदा म्हणजेच लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ हा बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण करण्यासाठी आणि अशा घटनातील गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी भारत सरकारने २०१२ साली तयार केलेला कायदा आहे. पोक्सो हे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्स्च्युअल ओफेन्सेसचे लघुरूप आहे,असे प्रतिपादन करून विद्यार्थ्यांना या कायद्याची माहिती दिली. ऍड रीना गणवीर यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण हक्क कायद्याची माहिती दिली.
भारतीय संसदेचा ४ ऑगस्ट २००९रोजी लागू केलेला कायदा आहे, ज्यामध्ये वयाच्या वयोगटातील मुलांसाठी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या महत्त्वाच्या पद्धतींचे वर्णन केल्याचे त्यांनी सांगितले. ऍड भीमा गेडाम यांनी भृण हत्या,बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेची माहिती दिली.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा डॉ सुधीर अग्रवाल यांनी विधी सेवा जनजागृतीचा अन्वयार्थ स्पष्ट करून विद्यार्थ्यांना आपल्या हक्क आणि कर्तव्याची जाणीव करून दिली व कायद्याचे महत्व व विविध कायद्याची माहिती दिली.कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन प्रा डॉ.निता वानखेडे यांनी केले. सदर कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी व शिक्षक वृंद उपस्थित होते.