यवतमाळ :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त कायदेविषयक जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबीराचे अध्यक्ष म्हणून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश न्हावकर उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हा न्यायाधीश-२ एस.आर. शर्मा, मुख्य न्यायादंडाधिकारी ए. एम. शाह व जिल्हा सरकारी वकील निती दवे, जिल्हा महिला व बालविकास कार्यालयातील सखी वन स्टॉप सेंटरच्या जिल्हा केंद्र प्रशासक मिनल जगताप उपस्थित होते.
प्रमुख जिल्हा व सत्र नयायाधीश नागेश न्हावकर यांनी सामाजिक जीवनात पुरूषांप्रमाणेच महिला देखील मोलाचे योगदान देतात. परंतु, अनेक ठिकाणी पुरूषांसारखे समान अधिकार महिलांना दिले जात नाहीत. महिलांनी दिलेल्या योगदानाचे महत्व समजण्यासाठी आणि प्रत्येक गोष्टीत त्यांना समान अधिकार देण्याच्या उद्देशाने महिला दिवस साजरा करावा व महिलांनी नकारात्मक विचारांपासून दूर राहून आपले लक्ष साध्य करण्यासाठी प्रयत्नशिल असावे, असेही यावेळी सांगितले.
जिल्हा न्यायाधीश-२ एस. आर. शर्मा यांनी महिलांनी समाजात चांगल्याप्रकारे जगावे, अन्याय, अत्याचाराला बळी पडता कामा नये. तसेच हुंडा प्रतिबंधक कायदा व कौटुंबिक हिंसाचार यावर प्रकाश टाकला. मिनल जगताप यांनी कौटुंबिक हिसांचारापासुन महिलांचे संरक्षण कायदा यावर प्रकाश टाकला. शासन महिलांच्या कल्याण आणि विकासासाठी अनेक योजना राबवत आहे. महिलांना आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्टया सक्षम बनविणे हा या योजनांचा उद्देश आहे, असे सांगितले.
कार्यक्रमास सत्र न्यायाधीश ए.ए. लउळकर, मुख्य न्यायदंडाधिकारी ए.एम. शाह, तसेच सचिव के.ए. नहार, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष संजय जैन, सरकारी वकील निती दवे तसेच जिल्हा मुख्यालयातील सर्व महिला न्यायिक अधिकारी, महिला वकील व महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन व आभार सह दिवाणी न्यायाधीश आर. एस. मोरे यांनी केले. शिबीरामध्ये महिला बचत गट मार्फत विविध क्षेत्रांमधील महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले. यामध्ये घाटंजीच्या कृषि सखी योगिता धुर्वे, माजी प्रभागसंघ अध्यक्ष पपिता मुन, तिरझडाच्या सरपंच कविता येवले, कळंबच्या पशु सखी सोनू कांबळे यांनी अनुभव सांगितले.