यवतमाळ :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा लोहाराच्या संयुक्त विद्यमाने ‘बाल लैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच मुलींवरील सर्व प्रकारचा हिंसाचार दुर करण्यासाठी पावले उचलणे’ या विषयावर कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव कुणाल नहार हे होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष कुणाल नहार यांनी समाजात वावरत असतांना चांगल्या गोष्टी आत्मसात करावे, वाईट गोष्ट सोडून द्यावे, असे सांगितले, बाल लैगिंक अत्याचार कायदा २०१२ या विषयावर त्यांनी प्रकाश टाकला तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मिना तर प्रमुख वक्ते म्हणून जिल्हा समुपदेशक माधुरी कोटेवार, पॅनल वकील निलिमा जोशी यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या निलिमा जोशी यांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा, २०१२ याविषयावर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी उपस्थित मुलींना चांगला स्पर्श व वाईट स्पर्श कसा ओळखावा याबाबत विस्तृत माहिती दिली. तसेच असे काही विद्यार्थीनीसोबत घडत असल्यास त्यांनी आपल्या शिक्षकांना किंवा आई-वडीलांना निर्देशनास आणून द्यावे, जेणेकरून समोरील अनर्थ टळू शकतो याबाबत माहिती दिली.
जिल्हा समुपदेशक माधुरी कोटेवार यांनी लहान मुलांच्या अधिकारांविषयी सांगितले. आजच्या युगात प्रेम, मैत्री, विवाह योग्य की अयोग्य याविषयी योग्य मार्गदर्शन केले. अन्यायावर आवाज उठवण्याकरीता कोणाची मदत घ्यावी आणि प्रत्येक मुल कसे सुरक्षित राहील याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे संचलन व आभार शिक्षिका अश्विनी बास्कर यांनी केले. या कार्यक्रमाकरीता मोठ्या संख्येने शाळेतील विद्यार्थीनी व विद्यार्थी तसेच शिक्षक वर्ग उपस्थित होते.