अमरावती :-अनुवादाच्या माध्यमातून रोजगाराच्या सुवर्ण संधी या विषयावर संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील पदव्युत्तर विभागाच्या वतीने नुकतेच व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. हेमंत खडके होते, तर प्रमुख वक्ता म्हणून अनुवाद हिंदी विभागाचे माजी विद्यार्थी व सध्या नांदेड येथील स्टेट बँक ऑफ इंडिया येथे राजभाषा व्यवस्थापक म्हणून कार्यरत राहुल खटे उपस्थित होते.
मार्गदर्शन करतांना प्रमुख वक्ता राहुल खटे म्हणाले, अनुवाद हिंदी अभ्यासक्रम रोजगाराभिमुख असाच आहे, त्यामध्ये अनुवाद साहित्य, इतिहास, भाषाशास्त्र, कोषशास्त्र, राजभाषा हिंदी, प्रयोजनमुलक हिंदी इत्यादींचा समावेश आहे. विद्याथ्र्यांनी उपलब्ध सांधनांचा लाभ घेऊन भविष्याकडे वाटचाल करावी. ते पुढे म्हणाले की, कोषशास्त्रातील शब्दकोष निर्मिती प्रक्रियेंतर्गत शब्दांची उत्पत्ती, व्याकरण आणि संदर्भानुसार शब्दांचा वापर करावा. कोणत्याही भाषेतील शब्दांचा अर्थ सारखाच असतो व भाषांचे शब्द हिंदी भाषेत समाविष्ट केले जातात, ज्यामध्ये शब्दांची वर्तनी, व्युत्पत्ती, व्याकरण, निर्देशांचा अर्थ, व्याख्या, वापर आणि पदार्थ इत्यादींचा समावेश होतो. शब्दकोष एकभाषिक, द्विभाषिक आणि बहुभाषिक आहेत. बहुतेक शब्दकोष देवनागरीतील शब्दांचे उच्चारण आंतरराष्ट्रीय ध्वनात्मक लिपी व ऑडिओ फाईल म्हणून देतात. काही शब्दकोष चित्रांद्वारे जसे, विज्ञान कोष, वैद्यकीय कोष, विधी कोष, गणितीय कोष इत्यादी विविध क्षेत्रांसाठी वेगवेगळे कोष आहेत व ते भाषांतरकार पदासाठी योग्य आहेत. त्यामुळे शासकीय सेवेत अनुवादक, राजभाषा अधिकारी अशा पदांसाठी घेण्यात येणा-या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी फायदेशीर ठरतात.
अध्यक्षीय भाषणात डॉ. हेमंत खडके म्हणाले, राहुल खटे यांनी भाषिक किंवा तांत्रिक क्षेत्रात केलेले कार्य अत्यंत प्रशंसनीय असून अशा विषयावर विचार व संशोधनाची नितांत गरज आहे. कार्यक्रमाचे संचालन प्रा.मालती यादव, तर आभारप्रदर्शन डॉ. सुनिता बुंदेले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभागातील डॉ.जयश्री बडगे, डॉ.चंदन विश्वकर्मा, प्रा. रेखा धुराटे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला विभागातील विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.