– शंभर टक्के शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे तालुका कृषी अधिकारी भोये यांचे आवाहन
रामटेक :- महाराष्ट्रात २०१६ पासून पंतप्रधान पीक विमा योजना राबवण्यात येत आहे. मात्र यंदापासून राज्य सरकारच्या वतीने सर्वसमावेशक पीक विमा योजना राबवली जात आहे. यामध्ये फक्त एक रुपयात शेतकऱ्यांना पिक विमा काढण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. याबाबत रामटेक तालूक्यातील शेतकर्यांना माहीती मिळावी व त्यांचा शंभर टक्के सहभाग या योजनेत असावा यादृष्टीने तालुका कृषी कार्यालय,रामटेक येथे प्रधानमंञी पीक विमा योजना माहिती रथाला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ नायब तहसिलदार भोजराज बडवाईक, आमदार आशिष जयस्वाल यांचे स्विय सहायक पुरुषोत्तम मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी रामटेक तालूका कृषी अधिकारी दिनेश भोये यांनी शंभर टक्के शेतकऱ्यांनी यात सहभागी होण्याचे आवाहण केले. हा माहिती रथ पिक विमा योजनेची माहितीपत्रके तालुक्यातील सर्व गावांमध्ये वितरित करणार असल्याचेही यावेळी दिनेश भोये यांनी सांगीतले.
दि.२३ जून २०२३ च्या शासन निर्णयान्वये सन २०२३-२४ पासून सर्वसमावेश पीक विमा योजना राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. सर्व समावेशक पीक विमा योजना खरीप व रब्बी हंगामाकरीता लागू करण्यात आली आहे. यामध्ये हवामान घटकाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान,पीक पेरणीपासून काढणी पर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर,क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड,कीड व रोग इ. बाबींमुळे उत्पन्नात होणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान,नैसर्गिक कारणांमुळे पिकाचे होणारे काढणी पश्चात नुकसान यांचा समावेश करण्यात आला आहे. केंद शासनाने प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी २ टक्के,रब्बी हंगामा साठी १.५ टक्के तसेच खरीप व रब्बी हंगामातील नकदी पिकांसाठी ५ टक्के असा मर्यादित ठेवला आहे. सर्वसमावेशक पिक विमा योजनेअंतर्गत सदरचा शेतकरी हिश्य्याचा भार सुध्दा शेतकऱ्यांवर न ठेवता शेतकऱ्यांच्या हिस्स्याची विमा हप्ता रक्कम राज्य शासना मार्फत भरला जाईल, त्यामुळे सन २०२३-२४ पासून शेतकऱ्यांना केवळ १ रुपया भरुन पिक विमा पोर्टलवर नोंदणी करता येईल आणि प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत निश्चित करण्यात आलेली शेतकरी हिस्स्याची पिक निहाय प्रती हेक्टरी विमा हप्ता रक्कम व शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात भरावयाचा विमा हप्ता रक्कम रु. १ वजा जाता उर्वरीत फरकाची रक्कम राज्य हिस्सा अनुदान म्हणून राज्य शासनामार्फत अदा करण्यात येईल. सदर योजनेमध्ये शेतकरी केंद्र शासनाच्या मागदर्शक सूचनां नुसार केंद्र शासनाचे पिक विमा पोर्टल,सामायिक सुविधा केंद्र,बँक इ.माध्यमांद्वारे सहभागी होऊ शकतात अशी माहिती यावेळी तालुका कृषी अधिकारी दिनेश भोये यांनी दिली. यावेळी उपस्थितांमध्ये राज मेश्राम,दिपक गराडे,दिनेश उईके, माधव पवार,दिप्ती वाहाने, संतोष हराड,महादेव कोकाटे,यांचेसह कृषी विभागाचे अधिकारी व कृषी सहाय्यक उपस्थित होते.