– स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘मेरी माटी मेरा देश ‘ उपक्रम
नागपूर :- ‘ मेरी माटी मेरा देश ‘, या उपक्रमामध्ये 1 ते 30 सप्टेंबर या कालावधीत अमृत कलश यात्रा आयोजित करण्याच्या राज्य शासनाच्या आदेशाला गावागावातून उत्तम प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत एक हजार गावांमधून अमृत कलश यात्रा काढण्यात आली आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त यावर्षी ‘मेरी माटी मेरा देश’, हा उपक्रम राबविण्यात येत असून केंद्र व राज्य शासनाच्या दिशा निर्देशानुसार अमृत कलश यात्रा आयोजित करण्याबाबतच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. 1 ते 30 सप्टेंबर या कालावधीत गावागावात या संदर्भात अनेक उपक्रम साजरे होणार आहे. प्रत्येक गावात अमृत वाटिका तयार करण्याचे देखील निर्देशित करण्यात आले आहे. गावामध्ये माती व तांदूळ गोळा करताना पंचप्राण प्रतिज्ञा घेण्याची सूचना केली आहे. जिल्ह्यातील संपूर्ण गावांमध्ये हा उपक्रम 30 तारखेपर्यंत पूर्ण करायचा आहे.
13 ऑक्टोबरपर्यंत तालुक्यात मोहीम
प्रत्येक गावातून जमा होणारा एक कलश तालुक्याच्या ठिकाणी गटविकास अधिकाऱ्यांकडे 30 सप्टेंबर पर्यंत जाणार आहे. त्यानंतर सर्व माती एकत्रित करून तालुकास्तरावर प्रतिनिधिक एक कलश तयार करण्यात येणार आहे. उरलेल्या सर्व मातीचा उपयोग तालुका स्तरावर तयार केलेल्या अमृतवाटीकेसाठी करण्यात येणार आहे. तालुकास्तरावर या संदर्भात मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून या कार्यक्रमांना स्थानिक लोकप्रतिनिधींना सहभागी करण्यात येणार आहे.
तालुक्यातून तयार करण्यात आलेले अमृत कलश मुंबई मार्गे दिल्ली येथील कार्यक्रमासाठी पाठविण्यात येणार आहे. एका तालुक्यातून दोन स्वयंसेवक व एक युवक नेहरू युवा केंद्राच्या मार्फत निवडण्यात येणार आहे.
या संपूर्ण मोहिमेकडे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा व जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर लक्ष वेधून आहेत.