वयोश्री योजनेच्या लाभातून कोणीही वंचित राहणार नाही – देवेंद्र फडणवीस

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत ४ कोटींचे साहित्य वाटप

नागपूर :- ज्येष्ठ नागरिक हे प्रत्येक पिढीचे वैभव असते. त्यांनी खस्ता खाल्ल्या म्हणून आजचे चांगले दिवस आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे जबाबदारी म्हणून वयोश्री योजनेतील साहित्य वाटपातून कोणीही वृद्ध वंचित राहणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले .

केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय, दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग, सामाजिक न्याय व सक्षमीकरण विभाग यांच्यामार्फत आज नागपूर येथे दक्षिण -पश्चिम आणि पश्चिम नागपूर मतदार संघाकरिता राष्ट्रीय वयोश्री योजना व दिव्यांग सहायता योजना अंतर्गत साहित्य वाटप शिबीर घेण्यात आले होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांनी वयोश्री योजनेतील प्रातिनिधीक साहित्य वाटप केले. कार्यक्रमासाठी दीक्षाभूमी परिसरातील काच्छीपुरा येथील पीकेव्ही मैदानावर हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

भारतीय कृत्रिम अंग निर्माण मंडळ ( एलिम्को ) कानपूर, नागपूर महानगरपालिका नागपूर, सीआरसी नागपूर यांच्या मार्फत कुत्रिम अवयव, चष्मा, व्हीलचेअर, श्रवण यंत्र, वाकींग स्टीक अशा अनेक पूरक साहित्याचे वाटप करण्यात येत आहे. आज एका दिवशी ४ कोटी किंमतीच्या साहित्याचे वाटप करण्यात आले. याच ठिकाणी वृध्दांसाठी तपासणी शिबीराचेही आयोजन करण्यात आले होते.

मंचावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह आमदार प्रवीण दटके,पारिणय फुके, मोहन मते, विकास कुंभारे, कृष्णा खोपडे, जिल्हाधिकारी विपीन इटणकर, मनपा आयुक्त व प्रशासक राधाकृष्णन बी., नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सुर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीना, राम जोशी आदी उपस्थित होते.

यावेळी संबोधित करताना उपमुख्यमंत्री म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दातृत्वाच्या भूमिकेतून वयोश्री सारखी अत्यंत महत्त्वाची योजना ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी तयार केली आहे. वरिष्ठ नागरिकांना आयुष्याच्या उत्तरार्धात सहजपणे जीवन जगता यावे, यासाठी या साहित्याची गरज असते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अतिशय कल्पकतेने नागपूर शहरासाठी या योजनेची वितरण यंत्रणा उभारली आहे. त्यामुळे दक्षिण -पश्चिम, पश्चिम नागपूर मतदार संघातील एकही लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही. ज्यांना आता साहित्य मिळाले नसेल त्यांना पुढच्या वेळी नक्की साहित्य मिळेल. याची हमी मी देतो,प्रत्येकालाच लाभ होईल.

सरकारी योजनांमध्ये साहित्याचा दर्जा कायम वादग्रस्त असतो. मात्र या योजनेसाठी अतिशय उत्तम दर्जाचे साहित्य वितरित करण्यात येत असून जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत पुरेल असा या साहित्याचा दर्जा आहे.

यावेळी नितीन गडकरी यांनी संबोधित केले. ज्येष्ठांची सेवा ही ईश्वरीय सेवा असून रंजल्या गांजल्यांची सेवा करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले.

नागपुरात जेष्ठ नागरिकांसाठी सुंदर बाग -बगीचे, विरंगुळा केंद्र, यासोबतच जागतिक दर्जाचे दिव्यांग पार्क उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अनुसूचित जाती व आदिवासी समुदायात मोठ्या प्रमाणात सिकलसेल रुग्ण आढळतात. अशा रुग्णांना ‘बोन मॅरो ‘ ट्रान्सप्लांटेशन करण्यासाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अर्ध्या किमतीत उपचार उपलब्ध करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आजच्या शिबीरातून नागपूर शहर व जिल्हातील जेष्ठ नागरिक व दिव्यांगाना अनुक्रमे केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय वयोश्री योजना- २०२१ आणि दिव्यांग सहायता योजनेतून दक्षिण-पश्चिम आणि पश्चिम नागपुरातील ३९५० लाभार्थ्यांना रु ४ कोटीचे सहाय्यक उपकरणांचे वितरण करण्यात आले. यामध्ये अडीपचे ३७२ आणि वयोश्रीचे ३५७८ लाभार्थी आहे. त्यांना ३० हजार ५२० उपकरण नि:शुल्क दिली गेली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना जयंतीनिमित्त अभिवादन

Mon Sep 26 , 2022
मुंबई :- ‘अंत्योदय’ संकल्पनेचे जनक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘अंत्योदय’ दिनाच्याही शुभेच्छा दिल्या आहेत. नंदनवन निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ‘पंडित दीनदयाळ यांनी अंत्योदय संकल्पना मांडून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहचविण्याचा ध्यास घेतला. त्यांचा हा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com