नागपूर :- शहरातील महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचाराला प्रतिबंध घालण्यासाठी आणि कौटुंबिक कलह मिटविण्यासाठी महापालिकेने प्रत्येक झोनमध्ये स्व. अनुसयाबाई काळे समुपदेशन केंद्र सुरू केले आहे. एप्रिल 2024 ते फेब्रुवारी 2025 या काळात समुपदेशन केंद्रांमध्ये 1043 प्रकरणांची नोंद झाली आहे.
महिलांना कोणत्याही अडचणी आल्यास त्या झोन स्तरावरच सोडविण्यासाठी स्व. अनुसयाबाई काळे समुपदेशन केंद्र झोननिहाय सुरु करण्यात आले आहे. या केंद्रामुळे पीडित महिलांना न्याय व दिलासा देण्याचा महापालिकेचा हा प्रयत्न आहे.
महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात झोननिहाय समुपदेशन केंद्र सुरू करण्याचा मानस व्यक्त केला आहे. महिलांनी स्वावलंबी व्हावे आणि घरातील कलह काहीसे दूर व्हावे, हा या संकल्पनेमागचा मुख्य उद्देश आहे.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे समुपदेशन केंद्र व मदत केंद्रांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार नागपूर महानगरपालिकेतर्फे प्रत्येक झोनमध्ये स्व. अनुसयाबाई काळे समुपदेशन केंद्र स्थापन केले आहे. अनेक महिलांना न्याय देण्यास तसेच कौटुंबिक कलह कमी करण्यात या समुपदेशन केंद्रांना यश आले आहे.
समाज विकास विभागांतर्गत लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमान नगर, धंतोली, नेहरू नगर, गांधीनगर, सतरंजीपुरा, लकडगंज आशीनगर, मंगळवारी या दहा झोनमध्ये समुपदेशन केंद्र कार्यरत आहेत. स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून ही केंद्रे संचालित करण्यात येत आहे. समुपदेशन केंद्रातून अनेक महिला व त्यांच्या कुटुंबियांनी लाभ घेतला आहे. एप्रिल २०२४ ते फेब्रुवारी 2025 या काळात 1043 प्रकरणांची नोंद समुपदेशन केंद्रात झाली आहे.