– रोजगार मेळ्यामध्ये तरुणांसोबत साधला संवाद; सरकारी नोकरीची नियुक्तीपत्रे प्रदान
नागपूर :- देशाची प्रगती साधायची असेल तर २५ वर्षे पुढे जाऊन विचार करावा लागेल. सरकारी नोकरी करताना तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल. तुमच्यावर असलेली जबाबदारी योग्यरित्या पार पाडताना देशासाठी काम करण्याची इच्छाशक्ती बाळगावी लागेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
भारतीय डाक विभागाच्या वतीने वनामतीच्या सभागृहात आयोजित रोजगार मेळ्यामध्ये ना. गडकरी बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील ४६ केंद्रांवर ५१ हजारांहून अधिक तरुणांना सरकारी नोकरीची नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आभासी पद्धतीने उपस्थिती होती. नागपूर केंद्रावर एकूण २२२ तरुणांना सरकारच्या विविध विभागांमधील नोकरीची नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी ना. नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. तर नागपूर क्षेत्राच्या पोस्ट मास्टर जनरल शोभा मधाळे आणि जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे संचालक प्रशांत काळपांडे व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित होते. ना. गडकरी यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात ८ तरुणांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी कुठलेही काम करण्यासाठी इच्छाशक्ती गरजेची असल्याचे ना. गडकरी म्हणाले. ‘तुम्हाला उत्तम तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले, सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या, तरीही चांगले काम करायचे असेल तर तंत्रज्ञान आणि सोयीसुविधांसोबतच इच्छाशक्तीही तेवढीच महत्त्वाची आहे. यासोबतच सरकारमध्ये नोकरी करताना जलद निर्णयाची क्षमता, पारदर्शकता, तत्परता ठेवली तर सर्वसामान्य नागरिकांना योग्य सेवा देता येते, याचीही जाणीव ठेवावी,’ असे ना. गडकरी तरुणांना म्हणाले. ‘नव्या पिढीला देशसेवा करण्याची संधी मिळावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोजगार मेळ्याच्या माध्यमातून या उपक्रमाला गती दिली,’ असेही ना. गडकरी म्हणाले.
स्वप्नपूर्तीचा आनंद
नागपुरात एकूण २२२ तरुणांना विविध विभागांची नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. यामध्ये डाक विभाग, एफसीआय, आयकर विभाग, सीपीडब्ल्यूडी या कार्यालयांमधील नियुक्त्यांचा समावेश होता. यावेळी तरुणांच्या चेहऱ्यावर स्वप्नपूर्तीचा आनंद झळकत होता.