– ३१ डिसेंबर पूर्वी ऑनलाईनरित्या मालमत्ता कर भरल्यास १० टक्के सूट
नागपूर :- नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ता धारकांसाठी मनपाद्वारे मालमत्ता कर सवलत योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ३१ डिसेंबरपर्यंत चालू वर्षाचे पूर्ण मालमत्ता कर ऑनलाईनरित्या भरल्यास १० टक्के सूट दिली जाणार आहे.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात ही योजना सुरू करण्यात आली आहे. ३१ डिसेंबरपर्यंत ही योजना असून या कालावधीमध्ये आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये मालमत्ता कराची चालू वर्षाची पूर्ण रक्कम एकमुस्त ऑनलाईन माध्यमातून नागपूर महानगरपालिका निधीत जमा करणाऱ्या मालमत्ता धारकास कर रक्कमेत १० टक्के सूट दिली जाणार आहे. याशिवाय ऑफलाईन माध्यमातून कर भरणाऱ्या मालमत्ता धारकास ५ टक्के सूट देण्यात येणार आहे.
योजनेला नागपूर शहरातील मालमत्ता धारकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून योजनेचे शेवटचे तीन दिवस शिल्लक आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मालमत्ता धारकांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपायुक्त (महसूल) मिलींद मेश्राम यांनी केले आहे.