– 9 श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान केले जाणार
नवी दिल्ली :- वर्ष 2024 करिता सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्याकरिता केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या जल संसाधन विभाग, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाने त्यांच्या www.awards.gov.in या पोर्टलव्दारे अर्जांची नोंदणी करण्याचे आव्हान केले आहे. यासाठी नागरिकांना केवळ पोर्टलव्दारे अर्ज भरण्याविषयी विभागने स्पष्ट निर्देश दिले आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2024 राहील.
जलसंपत्ती संवर्धनाच्या दिशेने केलेल्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक करण्यासाठी आणि पाणी संवर्धनात जनतेला जागरूक करण्यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो. 2018 मध्ये पहिल्यांदा हा पुरस्कार सुरू करण्यात आला.
अर्जासाठी आवश्यक पात्रता व पुरस्काराचे स्वरुप आणि पुरस्कारांच्या श्रेणीची माहिती अशी राहील.
पात्रता:- जलसंधारण आणि व्यवस्थापन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या राज्य, जिल्हा, ग्राम पंचायत, शहरी स्थानिक संस्था, शाळा/महाविद्यालय, संस्था (शाळा/महाविद्यालय व्यतिरिक्त), उद्योग,नागरी संस्था किंवा जल वापरकर्ता संघटना अर्ज करण्यास पात्र ठरतील.
पुरस्कार स्वरूप:-‘सर्वोत्तम राज्य’ आणि ‘सर्वोत्तम जिल्हा’ या श्रेणीतील विजेत्यांना ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येईल. उर्वरित श्रेणीतील म्हणजेच ‘सर्वोत्तम ग्राम पंचायत’, ‘सर्वोत्तम शहरी स्थानिक संस्था’, ‘सर्वोत्तम शाळा/महाविद्यालय’, ‘सर्वोत्तम संस्था’, ‘सर्वोत्तम उद्योग’, ‘सर्वोत्तम नागरी संस्था’, आणि ‘सर्वोत्तम जल वापरकर्ता संघटना’ या विजेत्यांना रोख पारितोषिक, सन्मान चिन्हआणि प्रशस्तीपत्र देण्यात येईल. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे 2 लाख रुपये, 1.5 लाख रुपये आणि 1 लाख रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाईल.
पुरस्कारांचे वर्गीकरण:-
1. सर्वोत्तम राज्य: राज्य सरकार किंवा केंद्रशासित प्रदेश, सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र
2. सर्वोत्तम जिल्हा: जिल्हा प्रशासन, सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र (पाच क्षेत्रांमधून 5 पुरस्कार)
3. सर्वोत्तम ग्राम पंचायत: ग्राम पंचायत, रोख पारितोषिक आणि ट्रॉफी
4. सर्वोत्तम शहरी स्थानिक संस्था: शहरी स्थानिक संस्था, रोख पारितोषिक आणि सन्मान चिन्ह
5. सर्वोत्तम शाळा/महाविद्यालय: शाळा/महाविद्यालय, रोख पारितोषिक आणि सन्मान चिन्ह
6. सर्वोत्तम संस्था: शाळा/महाविद्यालय व्यतिरिक्त संस्था, रोख पारितोषिक आणि सन्मान चिन्ह
7. सर्वोत्तम उद्योग: उद्योग, रोख पारितोषिक आणि सन्मान चिन्ह
8. सर्वोत्तम नागरी संस्था: नोंदणीकृत NGO किंवा नागरी संस्था, रोख पारितोषिक आणि सन्मान चिन्ह
9. सर्वोत्तम जल वापरकर्ता संघटना: जल वापरकर्ता संघटना, रोख पारितोषिक आणि सन्मान चिन्ह
पुरस्कार निवड प्रक्रिया:-सर्व अर्जांची पहिली तपासणी जल संसाधन विभागाच्या निवडसमितीमार्फत केली जाईल. शॉर्टलिस्ट केलेल्या अर्जांची प्रत्यक्ष पडताळणी जल संसाधन विभागाच्या केंद्रीय जल आयोग आणि केंद्रीय भूजल मंडळाद्वारे केली जाईल. निवड समितीच्या शिफारशींनंतर अंतिम विजेते जलशक्ती मंत्रालयाच्या केंद्रीय मंत्र्यांच्या मंजुरीनंतर जाहीर करण्यात येतील.