चंद्रपूर :- मालमत्ता व पाणी करात १० टक्के सुट मिळविण्यास अंतिम ४ दिवस शिल्लक असल्याने नागरिकांनी करांचा एकमुस्त भरणा करून सुटचा लाभ घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.
मोठ्या प्रमाणात कराची थकबाकी असल्याने वसुलीसाठी प्रत्येक झोननिहाय जप्ती पथक गठीत करण्यात आले असुन सदर जप्ती पथके पुर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. नळधारक व मालमत्ता धारकांना कर भरणे सोयीचे व्हावे या दृष्टीने शनिवार व रविवार या सुटीच्या दिवशीही चंद्रपूर महानगरपालिका कार्यालय सुरु राहणार असुन नागरीकांना कार्यालयीन वेळेत कराचा भरणा करता येणार आहे.
कराचा भरणा प्रियदर्शिनी चौक पाणी टाकी येथील मनपाचे पाणी पुरवठा कार्यालय, झोन कार्यालय क्रमांक १- संजय गांधी मार्केट सिव्हिल लाइन्स, झोन कार्यालय क्रमांक २- कस्तुरबा भवन, सात मजली इमारत गांधी चौक, झोन कार्यालय क्रमांक ३- देशबंधू चित्तरंजन दास प्राथमिक शाळा बंगाली कॅम्प येथे करता येऊ शकतो.
शहरातील मालमत्ता धारकांनी थकीत कराचा भरणा करावा यासाठी महानगरपालिकेमार्फत सूट देण्यात आली असुन याअंतर्गत ३१ ऑक्टोबर पर्यंत एकमुस्त भरणा केल्यास १० टक्के तर ०१/११/२०२२ ते ३१/१२/२०२२ पर्यंत कराचा एकमुस्त भरणा केल्यास चालू आर्थिक वर्षासाठी ५ % सुट देण्यात येत आहे.www.cmcchandrapur.com या लिंकवर Pay Water Tax Online या टॅबवर पाणी कराचा तर https://chandrapurmc.org या लिंकवर मालमत्ता कराचा ऑनलाईन भरणा करता येऊ शकतो. थकीत वसुली असलेल्या गाळेधारक व नळ धारकांना मोबाईल संदेशाद्वारे व ऑटोद्वारे कर भरण्याची आठवण करून देण्यात येत असुन, शहरातील नागरिकांनी अतिरिक्त करभरणा टाळण्यासाठी मार्केट गाळे कर व पाणी कर त्वरित भरण्याचे आवाहन मनपा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.