नागपूर, दि. 22 : कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्य शासनाद्वारे कृषी संजिवनी मोहीम राबविण्यात येत आहे. राज्यात 25 जून ते 1 जुलै 2022 या कालावधीत प्रत्येक दिवशी महत्त्वाच्या तंत्रज्ञान मोहिमांवर विशेष भर देवून प्रशिक्षणांची माहितीचा ब्लॉग, व्हॉट्सॲप व यूट्यूब चॅनलवर व्यापक प्रमाणावर प्रचार व प्रसार करण्यात येणार आहे. या उपक्रमांत शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाद्वारे करण्यात आले आहे.
दि. 25 जून रोजी विविध पिकांचे तंत्रज्ञान प्रसार, मूल्यसाखळी बळकटीकरण दिन, 26 जूनला पौष्टिक तृणधान्य दिवस, 27 जूनला महिला कृषी तंत्रज्ञान सक्षमीकरण दिवस, 28 जूनला खत बचत दिन, 29 जूनला प्रगतीशिल शेतकरी संवाद दिवस, 30 जूनला शेतीपूरक तंत्रज्ञान दिवस, 1 जुलैला कृषी दिन याप्रमाणे विविध उपक्रम साजरे करण्यात येणार आहेत.
कृषी विभाग, जिल्हा परिषद, कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्र आदींचे अधिकारी शासत्रज्ञ, कृषी मित्र यांच्या संयुक्त विद्यमाने उपरोक्त कार्यक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी होणार आहे. कृषी विद्यापीठाचे संशोधित तंत्रज्ञान, अद्ययावत कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्याचा अवलंब शेतकऱ्यांनी प्रभावीपणे करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
शेतकरी बंधूंनी कृषी विभागाच्या या ‘कृषी संजिवनी कार्यक्रमात’ सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक यांनी केले आहे.