कोराडी : २१९० मेगावाट स्थापित क्षमता असलेले कोराडी औष्णिक विदयुत निर्मिती केंद्राचा वीज उत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीचा नावलौकिक आहे. महाराष्ट्राला नियमित आणि स्वस्त दरात वीज पुरवठा करण्यात कोराडी औष्णिक विद्युत केंद्राचे मोठे योगदान आहे.
कामगिरी व कार्यक्षमता सातत्याने उत्कृष्ट ठेवण्यासाठी कोराडी औष्णिक विद्युत केंद्राने पॅट सायकल -२ मधे भरीव यश मिळविले आहे. पॅट (PAT) ही नॅशनल मिशन फॉर इनहान्स्ड एनर्जी National Mission for Enhanced Energy Efficiency (NMEEE) अंतर्गत बाजारपेठेवर आधारीत यंत्रणा आहे ज्यात व्यापार करता येणाऱ्या ऊर्जा बचतीच्या प्रमाणाद्वारे ऊर्जेची बचत अधिक खर्च प्रभावी बनवते. पर्यावरणपूरक जीवन ही या आयोजनामागची संकल्पना आहे.
कोराडी औष्णिक वीज केंद्राने विविध ऊर्जा संवर्धनाच्या प्रयोगानंतर नेट युनिट उष्णता दर २६६३.७० किलोकॅलरी/केडब्ल्यूएच साध्य केले व लक्षित नेट युनिट उष्णता दरात ६५५.९०किलोकॅलरी/केडब्ल्यूएच ने कमी करण्यात यश संपादन केले. सदर यशामुळे पर्यावरणाचा ऱ्हास/हानी कमी होण्यास हातभार लागला आहे.
कोराडी औष्णिक वीज केंद्राकडे सकारात्मक ESCerts ची संख्या १३२९९६ आहे, अंदाजे त्याची किंमत २४.४७ कोटी रुपये आहे. देशात एकूण सर्व नियुक्त ग्राहकांना (designated consumers) मिळालेल्या ESCerts पैकी ७ टक्के वाटा हा निव्वळ कोराडी औष्णिक विद्युत केंद्राचा आहे.
ब्युरो ऑफ एनर्जी एफिशिएनसीच्या स्थापना दिनी म्हणजेच १ मार्च रोजी ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. PAT-२ अंतर्गत १५४ राष्ट्रीय औष्णिक विद्युत केंद्रामध्ये देशातील ESCerts मिळवत कोराडी औष्णिक विद्युत केंद्र द्वितीय असल्यामुळे सदर कार्यक्रमात कोराडी औष्णिक विद्युत केंद्राचा यथोचित सन्मान करण्यात आला. या प्रसंगी आर. के. सिंग, मंत्री (ऊर्जा, नवीन व नविकरणीय ऊर्जा) भारत सरकार यांचे हस्ते कोराडी वीज केंद्राला सन्मानित करण्यात आले. कोराडी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता शरद भगत यांनी हा सन्मान नवी दिल्ली येथे स्वीकारला. याप्रसंगी भारत सरकारचे आलोक कुमार, सचिव, ऊर्जा मंत्रालय, अजय तिवारी, अतिरिक्त सचिव ऊर्जा मंत्रालय, ऊर्जा दक्षता ब्यूरोचे महासंचालक अभय भाकरे प्रामुख्याने उपस्थित होते.
महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.पी.अनबलगन, संचालक (संचलन) संजय मारुडकर, प्रभारी संचालक(प्रकल्प) अभय हरणे, कार्यकारी संचालक पंकज सपाटे यांच्या मार्गदर्शनामुळे हे यश संपादन करणे शक्य झाले तसेच कोराडी वीज केंद्रात कार्यरत अधिकारी,अभियंते, तंत्रज्ञ, कर्मचारी यांचे कामाप्रति असलेले समर्पण आणि उत्स्फूर्त सहभागाचा हा परिपाक असल्याचे मुख्य अभियंता शरद भगत यांनी सांगितले. त्यांनी कोराडी वीज केंद्राच्या संबंधित सर्वाचे विशेष अभिनंदन केले आहे.