-जग विख्यात सायकल पटू डॉ. अमित समर्थ यांचे सोबत
कोलितमारा जंगल हा पेंच राष्ट्रीय उद्यानाचा एक महत्वाचा भाग… पण हे जंगल काहीसे दुर्लक्षित आहे .. 2015 मध्ये या जंगलाला प्रथम भेट दिली होती आणि तिथली समृद्ध वनसंपदा आणि नाना विविध पक्षी बघून मन हरखून गेले होते. पर्यटकांची गर्दी नसल्यामुळे तेंव्हा जंगल अधिकच रमणीय वाटले होते .. त्यावेळी राखडी धनेश ( Grey Horn Bill ) या पक्षाने विशेष लक्ष वेधून घेतले होते.. त्यानंतर दिलेल्या भेटीत इतर वैविध्य पूर्ण पक्षांसोबत Malabar Horn Bill ह्या विलोभनीय पक्षानेही दर्शन दिले होते .. “कुवारा भिवसेन” हे अलीकडच्या काळात विकसित झालेले आणि लोकप्रिय होत असलेले पर्यटन स्थळ सुद्धा याच भागात आहे .. “कुवारा भिवसेन” हे आदिवासी बांधवांचे श्रद्धास्थान असलेले, मंदिर तलावाच्या रमणीय परिसरात आहे .. तलावातील बोटींग आणि बाजूलाच ट्रेकींग करिता असलेली छोटी टेकडी आदि पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या बाबी आहेत. इथे झुणका भाकर, कच्चा चिवडा आणि चहा/कॉफी, लिंबू सरबत अश्या गोष्टी मिळतात. हे स्थळ नागपूर पासून कोराडी-खापरखेडा- पारशिवनी मार्गे ७० किमी अंतरावर आहे.
कोलितमारा येथे वन विभागाने राहण्यासाठी छोटेखानी रिसॉर्ट उभारणी केले आहे.. डिलक्स रूम ₹2200/- आणि Dormitary ₹400/- प्रतिव्यक्ती असे माफक दर असून तेथेच कँटीन सेवा उपलब्ध असून वाजवी दरात उत्तम जेवणाची सोय आहे.
अश्या रमणीय ठिकाणी वन विभागाने डॉ अमित समर्थ यांच्या सोबत दि. 20 ऑगस्ट 2023 रोजी सायकलद्वारे जंगल भ्रमण करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याची पोस्ट वाचली आणि तत्क्षणी या वेगळ्या प्रकारच्या जंगल भ्रमण करण्यासाठी भाग घेण्याचा निश्चय केला. रजिस्ट्रेशनसाठी आमच्या टायगर सिटी सायकलींग क्लबचे उत्साही सदस्य ऊर्मित तवालिया यांची बहुमोल मदत झाली त्यांचे अनेक धन्यवाद.
वन विभागाचे उत्साही वन क्षेत्र अधिकारी ( RFO ) विशाल चव्हाण आणि त्यांच्या Team ने या सफारीचे उत्कृष्ट नियोजन केले होते. Glucose , पाणी, प्रथमोपचार, नाश्ता,भोजन आदीची चोख व्यवस्था होती आणि त्यासाठी त्यांची संपूर्ण टीम आतिथ्य भावनेने कार्यरत होती.
वन विभागाने अशी सायकलद्वारे जंगल भ्रमंती निरंतर सुरु रहावी यासाठी विशेषकरून उत्कृष्ट बनावटीच्या ४० Mountain Bikes खरेदी केल्या असून त्या पर्यटकांना ₹३००/- प्रति दिन या दराने उपलब्ध करुन देणार आहेत. जंगल भ्रमंतीसाठी Guide घेणे बंधनकारक असून त्याचे शुल्क ₹१०००/- इतके असेल.
पर्यटक स्वतःची सायकल सोबत नेऊ शकतात तथापि त्याचे नोंदणी शुल्क ₹१००/- इतके असेल.
वन विभागाच्या सायकल घेणे अधिक योग्य ठरते असे माझे मत झाले
जंगल सफारी, निवास व्यवस्था या माध्यमातून उत्पादक स्वरुपाचा रोजगार स्थानिक तरुण / तरुणींना त्यांचे गावातच उपलब्ध करुन देणे आणि त्यांचे रोजगाराकरिता होणारे स्थलांतर रोखणे हा स्तुत्य विचार त्यामागे आहे.
कोलीतमारा – नरहर – बनेरे – सितला देवी- चारगाव – कुवारा भिवसेन असा २५ किमी लांबीचा अतिशय रमणीय अश्या जंगलातून जाणाऱ्या या सफारीत वेगळीच मजा येते..
सायकलिंग ट्रॅकवर कधी कठीण चढाव तर कधी तीव्र उतार असे अनुभव येतात ..
चढाव कठीण दिवसांसारखे संपता संपत नाहीत आणि उतार सुखी क्षणांसारखे क्षणभंगुर ठरतात… पण चढावा नंतर उताराची खात्री असते असे.. जीवनाशी साधर्म्य दाखवणाऱ्या रस्त्याने आपण अर्धी लढाई जिंकून कुवारा भिवसेन येथे पोहोचतो. परिसराचा आनंद घेऊन परत त्याच वाटेने परत येतो.. जाणे, येणे पर्यटन स्थळाचा आनंद घेणे यासाठी किमान ५ तास तरी हवेत ..
जाताना किमान दोन लिटर पाणी आणि खूप घाम जात असल्यामुळे Electral Powder suppliment अत्यावश्यक आहे.
या सफारीत नागपूर, भंडारा, गोंदिया, आणि रामटेक या ठिकाणावरून सुमारे ८० सायकल पटूंनी उत्साहाने भाग घेतला.. त्यात १० वर्षे ते ७२ वर्षे वयोगटातील व्यक्ती सहभागी झाल्या होत्या.
समारोपाचे कार्यक्रमात डॉ. अमित समर्थ यांनी सर्वांना विस्तृत असे बहुमोल मार्दर्शन केले आणि जागतिक स्तरावरील सायकल मोहिमांचे अनुभव कथन करून उपस्थितांची मने जिंकली. योग्य प्रकारे सातत्यपूर्ण पूर्ण प्रशिक्षण घेऊन तुम्ही सुद्धा Ultra Cyclist निश्चितच होऊ शकता असा आत्मविश्वास वाढविणारा संदेश दिला.
या ठिकाणी जायचे म्हणजे सायकलिंग बंधनकारक नाही. अगदी फॅमिली सह सुद्धा आपण रिसॉर्ट, जंगल आणि पर्यटन स्थळांचा आनंद घेऊ शकतो. सर्व ठिकाणे आणि त्या ठिकाणी जाणारे रस्ते कार जाण्याकरीता सोयीचे आहेत.
कोलितमारा येथे पावसाळ्या नंतर कोअर गेट सफारी पुनश्च सुरु होणार असून बनेरा गेट वरून बफर सफारी नजीकच्या भविष्यात सुरु होणार आहे. अशी सफारी आपल्या वाहनाने अथवा outsourcing केलेल्या जिप्सीद्वारे करता येऊ शकेल. आपल्या वाहनाने ₹१५००/- ते ₹२०००/- तर ₹४०००/- ते ४५००/- इतका खर्च अपेक्षित आहे. स्थानिकांचे रोजगाराचा विचार करता आणि निश्चिंत मनाने जंगलाचा आनंद घेण्यासाठी जिप्सीचा पर्याय अधिक योग्य ठरावा.
यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने बुकिंग करता येते.
नजीकच्या भविष्यात कोलीतमारा येथून कुवारा भिवसेन पर्यंत २३ किमी अंतराचे बोटिंग सुरू होणार असून सुरक्षेच्या सर्व उपकरणासह हे बोटींग अत्यंत आनंददायी असणार यात शंका नाही. या बोटी सोलर पॉवर संचालित असल्यामुळे बोटिंमुळे होणारे तलावाचे संभाव्य प्रदूषणाला अटकाव होईल.
हॉट एयर बलून आणि पॅरासेलिंग हे साहसी क्रीडा प्रकार सुद्धा पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरणार असल्याबाबत विशाल चव्हाण ( RFO ) यांनी चर्चे दरम्यान माहिती दिली.
लहान मुलांचे चंचल मन रममाण होण्याकरिता बॅडमिंटन,कॅरम आणि शक्य असलेले इतर Indoor Games ची व्यवस्था झाल्यास संपूर्ण कुटुंब इथे आनंदाने वेळ व्यतीत करू शकेल. ह्या सूचनेचा वन विभागाने विचार करावा.
पर्यटकांनी या ठिकाणी जरूर भेट द्यावी आणि स्थानिकांचा उत्साह वाढवावा. तथापि, निसर्गाचा आनंद घेऊन परतताना निसर्गाच्या हिरव्या गालीच्यावर आपल्या पाऊलखुणा (पाऊच,प्लास्टिक प्लेटस ,पाणी बॉटल्स आदी ) उमटू नयेत याचीही दक्षता घ्यावी ही आग्रहाची नम्र विनंति