व्हॉइस ऑफ मीडियाची केंद्रीय कार्यशाळा उत्साहात,एप्रिलमध्ये विभागीय अधिवेशनाचे नियोजन; कौटुंबिक स्नेहसंमेलन!

पुणे : संघटनेचे भविष्यातील नियोजन, पत्रकारांना रोजगार व व्यवस्थापनाचे धडे, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, अशा कृतिशील कार्यक्रमाबरोबरच पत्रकारांच्या पाल्यांसाठी वेगवेगळ्या शिष्यवृत्तीची घोषणा व संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी नव्या दमाचे पत्रकार अनिल म्हस्के यांची निवड अशा वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांनी राज्यभरातील व्हॉईस ऑफ मीडियाच्या पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली.

व्हॉइस ऑफ मीडियाच्या केंद्रीय, राज्य, विभागीय व जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची दोन दिवसीय बैठक बारामती येथील बारामती क्लब येथे आयोजित करण्यात आली होती.

व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, केंद्रीय सरचिटणीस चंद्रमोहन पुप्पाला, केंद्रीय उपाध्क्ष धर्मेंद्र जोरे, कोषाध्यक्ष चेतन बंडेवार, सारिका माहोत्रा, प्रदेशाध्यक्ष राजा माने, नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष ग्रामीण अनिल मस्के. राज्य कोर टीमचे प्रमुख सचिन मोहिते, बालाजी मारगुडे, विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक, विजय चोरडिया, अभयकुमार देशमुख यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

या अधिवेशनामध्ये पत्रकारांना घरे बांधण्याच्या विषयासंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी संघटनेच्या हाऊसिंग सोसायटी विभागाचे प्रमुख संजय मालानी यांनी मार्गदर्शन केले. पत्रकारांसाठी नवीन सर्वंकष पत्रकार गृहनिर्माण धोरण तयार करण्यात आले पाहिजे, यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. डॉ. धर्मवीर भारती यांनी घरांच्या प्रोजेक्टबाबत सविस्तर माहिती दिली.

पत्रकारांनी आर्थिक स्वावलंबी झाले पाहिजे, यासाठी पत्रकारितेला रोजगाराची जोड दिली पाहिजे, या विषयावर अजय सिंग सावंत यांनी मार्गदर्शन केले. सावंत यांनी आजवर अनेकांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. परदेशांमध्ये स्किल वर्करला जास्त संधी असते. परदेशात जाण्याबाबतचा न्यूनगंड दूर सारून पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. या संदर्भात त्यांनी केरळचे उदाहरण दिले.

एप्रिल महिन्यात व्हॉइस ऑफ मीडियाचे विभागीय अधिवेशनाचे नियोजन आणि कौटुंबिक स्नेहमेळावा, पत्रकारांच्या गटचर्चा व विभागनिहाय परिसंवादामध्ये करण्यात आले.

माहिती तंत्रज्ञान व नियोजनाच्या क्षेत्रातील पत्रकारांना आवश्यक असलेला मूलमंत्र चंद्रमोहन पुप्पाला यांनी आपल्या मार्गदर्शनातून दिला. स्वतःला अपडेट ठेवले पाहिजे व सातत्याने अपग्रेड राहिले पाहिजे, तरच आपला बदलत्या परिस्थितीमध्ये निभाव लागू शकतो. आपली भाषा व्यवस्थापन, राहणीमान अपग्रेड करून आपण आपल्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचू शकतो, असे त्यांनी सांगितले.

प्रसिद्ध अशा लाडाची कुल्फी ब्रँडचे प्रमुख राहुल पापळ यांनी लाडाची कुल्फीच्या माध्यमातून केलेला यशस्वी प्रयोग सांगितला. राहुल यांनी पत्रकारांसाठी आपण कोणताही मोबदला न घेता रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊ, असे आपल्या मार्गदर्शनातून सांगितले. अवघ्या तीन वर्षांत हजारोंचा आपला उद्योग कोटीवर येऊन पोहोचला, असे सांगितले.

राज्यातील सर्व जिल्हा अध्यक्ष यावेळी आवर्जून उपस्थित होते.

अनिल मस्के यांची निवड

पत्रकार अनिल मस्के यांनी पत्रकारांचा विमा, त्यांना मदत व भविष्यातील नियोजन या संदर्भात केलेल्या कामांमुळे संघटनेने त्यांना प्रदेशाध्यक्षपदी बढती दिल्याचे संस्थापक-अध्यक्ष संदीप काळे यांनी यावेळी जाहीर केले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भलामोठा हार घालून श्री. मस्के यांचा सत्कार करून त्यांना चंद्रमोहन पुप्पाला,धर्मेंद्र जोरे यांच्या हस्ते प्रदेशाध्यक्षपदी नियुक्तीचे पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

विभागीय अध्यक्ष व पालकत्व

संघटनेच्या आगामी काळातील कामे व नियोजनासाठी विभागीय अध्यक्षांच्या जोडीला जिल्हा पालकमंत्र्यांची निवड करण्यात आली. विदर्भाचे अध्यक्ष मंगेश खाटीक सहयोगी पालकमंत्री म्हणून संजय पडोळे, पश्चिम महाराष्ट्राचे अभयकुमार देशमुख यांना मंत्री म्हणून सचिन मोहिते, मराठवाड्याचे अध्यक्ष विजय चोरडिया यांना बालाजी मारगुडे पालकमंत्री म्हणून सहकार्य करतील, तर उत्तर महाराष्ट्राचे विभागीय अध्यक्ष नरेश होळणार यांना सुरेश उज्जैनवाल हे पालकमंत्री म्हणून सहकार्य करतील.

फोटो ओळ

दोन दिवसीय कार्यशाळेत व्हॉईस ऑफ मीडिया राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे,राष्ट्रीय सरचिटणीस चंद्रमोहन पुप्पाला, धर्मेंद्र जोरे, चेतन बंडेवार, राजा माने, अनिल मस्के यांच्यासमवेत संपूर्ण केंद्रीय, राज्य, विभागीय व जिल्हा अध्यक्ष यांची उपस्थिती होती.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com