धुळे :- गेल्या दहा वर्षांची यशस्वी कारकीर्द आणि पुढील पंचवीस वर्षांच्या देशाच्या प्रगतीचा स्पष्ट आलेख असलेल्या भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व करणारे नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसवून देशाची जनता देशाच्या समृद्धीची, विकासाची वाटचाल सुरू ठेवणार आहे, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे नेते अमित शाह यांनी सोमवारी धुळे येथे व्यक्त केला. इंडी आघाडी, राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करत शाह यांनी विरोधकांच्या तुष्टीकरण धोरणाचे वाभाडे काढले. धुळे मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी-महायुतीचे लोकसभा उमेदवार डॉ.सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ झालेल्या प्रचंड जाहीर सभेत बोलताना शाह यांनी मोदी सरकारच्या दहा वर्षांच्या यशस्वी कारकीर्दीचा संपूर्ण आलेखच जनतेसमोर मांडला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री ( सार्वजनिक उपक्रम ) दादा भुसे, ज्येष्ठ नेते आ.जयकुमार रावल, आ.राहुल आहेर, माजी महापौर नाना करपे आदी यावेळी उपस्थित होते.
देशाच्या दृष्टीने ही निवडणूक महत्वपूर्ण आहे. देश कोणाच्या हाती सुरक्षित, समृद्ध राहणार याचा निर्णय जनतेला करावयाचा आहे. एका बाजूला 12 लाख कोटींचे घोटाळे करणारे काँग्रेस व इंडी आघाडी, आणि दुसऱ्या बाजूला आपल्या उभ्या कारकीर्दीत भ्रष्टाचाराचा एकही आरोप नसलेले नरेंद्र मोदी यांच्यातील ही लढाई आहे. एका बाजूला थोडासा उन्हाळा वाढताच बँकाँकला पळणारे राहुल गांधी आहेत, तर 23 वर्षांत एकही सुट्टी न घेता, दिवाळीत देखील सरहद्दीवर जवानांसोबत दिवाळी साजरी करत अखंडपणे देशसेवा करणारे पंतप्रधान मोदी आहेत. एका बाजूला चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेले राहुल गांधी आहेत, तर दुसरीकडे चहा विकणाऱ्या गरीबा घरी जन्मलेले नरेंद्र मोदी आहेत. या दोघांतून आपल्याला नेता निवडायचा आहे, असे शाह म्हणाले.
डॉ.भामरे यांना दिले जाणारे एक-एक मत नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मोलाचे ठरणार आहे. मोदींनी देशाला सुरक्षित बनविले, समृद्ध बनविले, देशाची प्रतिष्ठा जगात उंचावली आहे. अयोध्येत राम मंदिर निर्माण व्हायला हवे होते, पण काँग्रेस, शरद पवार आणि इंडी आघाडीने 70 वर्षे राम मंदिरात अडथळेच आणले. मोदींनी पाच वर्षांतच राम मंदिराची न्यायालयीन लढाई जिंकली, मंदिर बांधले, आणि श्रीरामाची प्राणप्रतिष्ठाही केली. या समारंभाचे निमंत्रणही या आघाडीच्या नेत्यांनी झिडकारले, आणि बहिष्कार घातला. राहुल गांधी, उद्धव ठाकरे यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण नाकारले, कारण या सोहळ्यास हजेरी लावली तर व्होट बँक नाराज होईल, याची त्यांना भीती होती. आम्हाला अशा मतपेढ्यांची भीती नाही. आमच्या सरकारने काशी विश्वनाथ, सोमनाथ मंदिरे आणि सर्व श्रद्धास्थळांचा, मंदिरांचा जिर्णोद्धार केला. याबरोबरच मोदी यांनी देशाला सुरक्षित बनविण्याचे काम केले आहे. काश्मीरमधील 370 कलम रद्द करून मोदी यांनी काश्मीरला देशाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेतले. महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिकही काश्मीरसाठी प्राण देण्यासाठी सज्ज आहे, याची काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांना कल्पना नाही अशी खिल्ली देखील त्यांनी उडविली. लांगूलचालनाच्या राजकारणापायी काँग्रेस आणि इंडी आघाडीवाले कलम 370 ला वर्षानुवर्षे कवटाळून बसले होते. मोदी सरकारने हे कलम रद्द केले, नक्षलवाद, दहशतवाद नष्ट करून देशाला सुरक्षित बनविले. 80 कोटी गरीबांना मोफत धान्य देऊन त्यांच्या जीवनात आनंद आणून त्यांची जीवनशैली उंचावण्याचे काम केले. इंदिरा गांधीपासून काँग्रेस केवळ गरीबी हटविण्याच्या घोषणाच करत होते. मोदी सरकारने घराघरांत गॅस दिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी पाच लाखांपर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत केले, कोविडकाळात लस निर्माण करून मोदींनी 130 कोटी लोकसंख्येला सुरक्षित केले. राजकारणात ज्यांचे लाँचिंग वीस वेळा फेल झाले, ते राहुल गांधी चंद्रावर यान कसे धाडणार, देशाला सुरक्षित, समृद्ध करू शकतील का, असा सवाल करून, हे तर केवळ कुटुंबाच्या विकासासाठी एकत्र आले आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
राम मंदिर, कलम 370, तिहेरी तलाक, याबाबत उद्धव ठाकरेंना जनतेने सवाल केले पाहिजेत. ते यावर बोलणार नाहीत, कारण ते काँग्रेस, शऱद पवारांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. उद्धव ठाकरेंनी मतांच्या लालसेने दहशतवादी कसाबचे समर्थन करणाऱ्या लोकांसोबत जाणे पसंत केले, असा आरोप त्यांनी केला. मोदी जेव्हा-जेव्हा देशहिताचे निर्णय घेतात, तेव्हा राहुल गांधी सवाल उपस्थित करतात. राहुल गांधींनी वीर सावरकरांना विरोध केला, इंडी आघाडीचे नेते सनातन धर्माचा विरोध करतात, उद्धव ठाकरे यांना हे मान्य आहे का, हे त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेसमोर स्पष्ट करावे, असे आव्हानही त्यांनी दिले. देशाला सुरक्षित, समृद्ध बनविण्याची क्षमताही नसलेल्या राहुल गांधी यांना पंतप्रधान बनवावे का, असा सवालही त्यांनी जनतेला उद्देशून केला, तेव्हा श्रोत्यांनी एकमुखाने नकाराच्या घोषणा दिल्या. मोदी यांच्याकडे गेल्या दहा वर्षांच्या कामाचा हिशेब आहे, आणि पुढच्या 25 वर्षांच्या कामाची आखणीदेखील आहे. मोदीना पंतप्रधान बनविणे म्हणजे, पाकिस्तानला मुहतोड जबाब देणे, देशातील कोट्यवधी युवकांना जगासोबत जोडणे, देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर नेऊन ठेवणे आहे, असेही ते म्हणाले.
दहा वर्षे सरकार असलेल्या युपीए सरकारने महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली, तर मोदी सरकारने 15 लाख कोटी दिले आहेत. महाराष्ट्रात भारताला पहिल्या क्रमांकाचे स्थान प्राप्त करून देण्याची कामगिरी देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारने बजावली आहे, केवळ भारतीय जनता पार्टीचे नेता नरेंद्र मोदी हेच देशाला आणि महाराष्ट्राला पुढे नेण्याचे काम करतील, अशी ग्वाही देत, डॉ.भामरे यांना विजयी करण्याचे आवाहन शाह यांनी केले. भामरे यांना विजयी करा, तुमच्या मतदारसंघाला सर्व क्षेत्रांत आघाडीवर नेण्याचे काम नरेंद्र मोदी करतील, असा विश्वासही शाह यांनी भाषणाच्या अखेरीस व्यक्त केला. धुळे जिल्ह्यात सहा महामार्गांचे काम वेगाने झाले आहे, केवळ धुळ्यात साडेतीन लाख घरांत नळाचे पाणी मोदीजींच्या संकल्पातून पोहोचले, रखडलेले अनेक सिंचन प्रकल्प सुमारे 2500 कोटी रुपये खर्चून धुळ्याची पाणी समस्या सोडविण्याचे काम देवेंद्र फडणवीस व डॉ.भामरे यांनी केले आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रात चार हजार कोटींची योजना आखली असून आचारसंहिता संपताच शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम थेट जमा होईल, अशी ग्वाही देखील शाह यांनी दिली.