पश्चिमबंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने दक्षिणेतील राज्यांकडे सुरू केलेली घोडदौड, आम आदमी पक्षाने स्वगृह दिल्लीनंतर पंजाब, गुजरात, हिमाचल व अन्य राज्ये तर ‘बीआरएस’ने तेलंगणातून महाराष्ट्राकडे केलेली कूच म्हणजे देशात ‘एनडीए व युपीए’ समोर तगडे आव्हान उभे करण्याची व्यूहरचना आखून दोन्ही आघाड्यांना कंटाळलेल्या देशातील जनतेसमोर तिसरा पर्याय देण्याचा विचार या तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या सुरू असलेल्या हल्लीच्या बैठकांवरून दिसून येत आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री तथा भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष के.चंद्रशेखर राव यांनी नांदेड येथून महाराष्ट्रात सिमोल्लंघन केले. त्यामुळे आपकी बार ‘किसान सरकार’ असा नारा देत महाराष्ट्राला नवा पर्याय देण्याचा प्रयत्न होईल. नांदेड येथील सचखंड गुरुद्वारा येथे केसीआर यांच्या सभेची तयारी गत काही दिवसांपासून सुरू होती. त्यांच्या सभेच्या जाहिराती राष्ट्रीय पातळीवरच्या वर्तमानपत्रांमध्ये ठळकपणे होत्या. त्यांच्या काल झालेल्या भाषणात महाराष्ट्रात होणाऱ्या शेतकरी आत्महत्या, दहा लाख वर्षाकाठी मदत, पिण्याच्या पाण्याची सोय व सिंचनासाठी पुरेशा प्रमाणात पाण्याची उपलब्धता, सार्वजनिक कंपन्यांची खाजगीकरण, केंद्र व राज्य सरकारचे अपयश इत्यादी प्रमुख मुद्यांनी व्यापलेले होते. ‘बीआरएस’ने महाराष्ट्रात घेतलेला प्रवेश हा राष्ट्रीय राजकारणात नव्या बदलांचा परिपाक होय. त्यातूनच महाराष्ट्राकडे घेतलेली झेप, नांदेड येथील विशाल सभेसाठी केलेले यशस्वी नियोजन हा त्याचाच भाग आहे. तेलंगणात सध्या विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत. त्याचपूर्वी, तेलंगणा राष्ट्र समितीने पक्षाचे नाव बदलत बीआरएस ( भारत राष्ट्र समिती) असे नवे नामकरण केले. किसान ब्रिगेडचे प्रमुख तथा आक्रमक शेतकरी नेते प्रकाश पोहरे हेही केसीआर यांच्यासोबत महाराष्ट्रात दिसून आल्याने ‘भारत राष्ट्र समितीने’ महाराष्ट्राबद्दल मोठा विचार केला असावा. केसीआर यांच्या कालच्या कार्यक्रमात नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, अहमदनगर, गडचिरोली आदी भागातील माजी आमदार, जिल्हा परिषद सदस्यांनी पक्ष प्रवेश घेतला. म्हणजे बीआरएस महाराष्ट्रात जोमाने काम करणार आहे. केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार असताना चंद्रशेखरराव यांनी त्यातून बहिर्गमन केले व स्वतंत्र भूमिका घेतली. त्यांच्यासोबत २०१९ च्या अहवालानुसार अन्यही प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांचा समावेश होता. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही ‘एनडीए’ विरोधात कठोर भूमिका घेऊन बंगाली जनतेचा कौल मिळवला. अरविंद केजरीवाल संयोजक असलेल्या आम आदमी पक्षाने दिल्लीतील सत्तेसोबतच एमसीडी मधील भाजपची सत्ता संपुष्टात आणली. आपने दिल्लीचा गडराखत पंजाबमध्ये बहुमताने सरकार स्थापन केले. गुजरात व हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीत ‘आप’ने मोजक्या जागा मिळवल्या असल्या तरी राष्ट्रीय पक्ष म्हणून नव्या रूपाने बहरला. नितीशकुमार व तेजस्वी यादव यांच्यातही घरोबा झाला. आक्रमक शैलीमुळे आपापल्या क्षेत्रात स्वतःचे प्राबल्य राखत इतरही राज्याकडे झेप घेणारे आम आदमी पक्ष, तृणमूल काँग्रेस व त्यानंतर आता भारत राष्ट्र समिती या तीनही पक्षांच्या नेत्यांच्या अलीकडे झालेल्या बैठकी एनडीएला सक्षम पर्याय म्हणून दिसून येत असल्याने उपरोक्त नोंदी प्रामुख्याने आवश्यक वाटतात. काँग्रेसला वगळता प्रादेशिक पक्षांनी देशातील इतर राज्यांकडे सुरू केलेले सीमोल्लंघन म्हणजे देशात तिसरी आघाडी अस्तित्वात येणार का, याचे संकेत मिळत आहे.
एकंदरच ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने दक्षिणेतील राज्यांकडे सुरू केलेली घोडदौड, आम आदमी पक्षाने स्वगृह दिल्लीनंतर पंजाब, गुजरात, हिमाचल व अन्य राज्ये तर ‘बीआरएस’ने तेलंगणातून महाराष्ट्राकडे केलेली कूच म्हणजे देशात ‘एनडीए व युपीए’ समोर आव्हान निर्माण करण्याची व्यूहरचना तर नव्हे. कंटाळलेल्या जनमानसाला हे तिन्ही पक्ष किती आपले करतील अन केसीआर यांची भारत राष्ट्र समिती मुळातच, विस्तापितांच्या श्रमातून प्रस्थापितांना धक्के देत अस्तीत्वात आल्याने केसीआर यांच्या भाषणाप्रमाणे, महाराष्ट्राला नवा पर्याय देऊ शकेल तर याचा केंद्रबिंदूच हा महाराष्ट्रातील शेतकरीच असला पाहिजे.
– शुभम बायस्कार, अमरावती