सावनेर :- देशात सर्वत्र २६ जुलै कारगिल विजय दिवस म्हणून पाळला जातो. मे १९९९ मधे पाकिस्तानी घुसखोरांना पिटाळून लावत भारतीय सैनिकांनी सर्वात उंचावरील कारगिल युद्ध जिंकले. जवळपास दोन महिने चाललेल्या या युद्धात आपल्या अनेक योध्यांना विरमरण प्राप्त झाले. त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि स्मृतीन्ना उजाळा देण्याच्या हेतूने स्थानिक लायन्स क्लब तर्फे माजी सैनिकांचा सत्कार-सन्मान घेऊन विजय दिवस साजरा करण्यात आला. सेवानिवृत्त सुभेदार मेजर बाबाराव पट्टे, लांसनायक नरेश मच्छले, नायक धनलाल कोलते, नायक डी. एम. सार्व्हे, हवालदार दिवाकर अंबरते या सैनिकांनी युद्धकाळातील रोमांचक आठवणीना उजाळा दिला आणि आजच्या पिढीतील नवयुवकांनी शिस्तप्रिय असावे तसेच देशसेवेकरीता तत्पर राहण्याचे आवाहन केले. क्लब च्या या उपक्रमाबद्दल सत्कार मूर्तिन्नी भावोदगार काढले. या प्रसंगी लायन्स क्लब चे पदाधिकारी वत्सल बांगरे, प्रा. विलास डोईफोडे, रुकेश मुसळे, हितेश ठक्कर, डॉ. शिवम पुण्यानी, ऍड. अभिषेक मुलमुले, डॉ. प्रवीण चव्हाण, प्रवीण टोणपे उपस्थित होते.