नागपूर :- “जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायचे आहे” हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश लक्षात घेऊन बहुजन नायक मा. कांशीरामजींनी ६००० जातीत विखुरलेल्या बहुजन समाजाला जागृत आणि संघटीत करून मताचे महत्व पटवून दिले आणि बहुजन समाजातून आमदार, खासदार निवडून आणून दाखवले, उत्तर प्रदेश सारख्या मोठया राज्यात सत्ताही निर्माण करून भारतीय राजकारणाला नवी दिशा दिली असे प्रतिपादन बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अँड.डॉ.सुरेश माने यांनी केले.
डॉ. सुरेश माने विदर्भ प्रदेश बीआरएसपी तर्फे बहुजन नायक मां कांशीरामजींचा १७ वा स्मृतीदिन व बीआरएसपीचा ८ वा वर्धापनदिना निमित्त आयोजित तीन दिवसीय कांशीराम मेळाव्याच्या समारोपिय कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
समारोपीय कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माजी मंत्री आ.डॉ. नितीन राऊत याप्रसंगी बोलताना म्हणाले की आगामी २०२४ च्या निवडणूकीत संविधान विरोधी भारतीय जनता पार्टीला सत्तेबाहेर करण्यासाठी सर्वांनी इंडिया आघाडीला मजबूत करावे.
सभेत हिमाचल प्रदेशचे माजी डीजीपी व बीआरएसपीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पृथ्वीराज, आय.एम.यू.एल. चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रो.मो.सुलेमान, उ.प्र.चे माजी खासदार राजबक्ष वर्मा, साहेबसिंग धनगढ, यांचीही भाषणे झाली.
देशात प्रथमच बीआरएसपीने तीन दिवसीय कांशीराम मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात तीन दिवसीय कार्यक्रमात विविध विषयांवर एकूण पाच परिसंवाद ठेवण्यात आले होते. या परिसंवादात राष्ट्रीय उपाध्यक्ष रमेश पाटील, गुजरातचे डॉ. रतिलाल रोहित, अँड. फिरदोस मिर्झा, देशोन्नतीचे जेष्ठ पत्रकार मिलींद किर्ती, बीआरएसपीचे राष्ट्रीय महासचिव जितेंद्र कुमार (दिल्ली), प्रा.संजय मगर, माजी सिनेट सदस्य शिलवंत मेश्राम, प्रा.जावेद पाशा, एल. के. मडावी, तेलंगनाचे व्ही.जी.आर नागरकोणी बीआरएसपी राज्य महासचिव प्रा.अरविंद कांबळे, अँड.भुपेन्द्र रायपुरे, प्रा. संजय बोधे यांनी दिलेल्या विषयावर आपले विचार मांडले. मेळाव्याच्या पहिल्या दिवशी देशपांडे सभागृहात झालेल्या उद्घाटन सत्रात महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेता आ. विजय वडेट्टीवार, प्रा.म. देशमुख, अनिरूध्द शेवाळे, जितेंद्र कुमार, डॉ. रतिलाल रोहित यांचे हस्ते डॉ. सुरेश माने लिखित ‘सनातन धार्माचे राजकारण’ आणि परिवर्तनाचा एल्गार लोककवी वामनदादा कर्डक” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तीन दिवसाच्या मेळाव्याचे अहवाल वाचन राष्ट्रीय उपाध्यक्ष रमेश पाटील यांनी केले. प्रास्ताविक अँड. भुपेन्द्र रायपुरे यांनी केले तर जिल्हाध्यक्ष डॉ.विनोद रंगारी यांनी आभार मानले.