नागपूर : यंदाची कै.भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा नागपूर येथे आयोजित करण्यात येणार आहे. स्थानिक चिटणवीस पार्क येथे 15 ते 19 फेब्रुवारीदरम्यान या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक तसेच समितीचे सदस्य उपस्थित होते.
राज्यातील खो-खो खेळाडूंना राज्य स्पर्धेत खेळण्याची जास्तीत जास्त संधी प्राप्त व्हावी तसेच त्यांना व क्रीडाप्रेमींना दर्जेदार खेळाडूंचे कौशल्य व खेळ पाहण्यास मिळावा यासाठी राज्यस्तरावर वरिष्ठ गटातील पुरुष व महिला तसेच 14 वर्षाखालील मुले व मुलींच्या स्पर्धा कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा या नावाने दरवर्षी महाराष्ट्र व विदर्भ खो-खो असोसिएशन यांच्यामार्फत आयोजित करण्यात येते. यंदा या स्पर्धेचे आयोजन विदर्भातील नागपुरात होणार आहे. या स्पर्धेत 800 खेळाडू, पंच व संघ व्यवस्थापक सहभागी होणार आहे.