महात्मा फुले यांचे सत्यशोधक समाजाचे विचार देशातील शेवटच्या तरुणाच्या मनात रुजविण्यासाठी प्रयत्न करावे…
सत्यशोधक समाजाचे विचारच देशाला जातीपातीच्या व धर्मभेदाच्या यादवीतून वाचवू शकतात – छगन भुजबळ
देशात फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांवर चालणारे शरद पवार हे एकमेव नेते – छगन भुजबळ
सत्यशोधक चळवळ पुढे नेताना पुण्यातील भिडे वाड्यासाठी रस्त्यावर उतरावेच लागेल…
सत्यशोधक समाज शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त खासदार शरद पवार यांच्या हस्ते सत्यशोधक चळवळीत काम करणाऱ्या समाजसेवकांचा सन्मान
मुंबई :- महात्मा फुले हे विज्ञानाचे, आधुनिक विचारांचे पुरस्कर्ते होते. त्यांचे हे काम पुढे नेण्याचे अतिशय चिकाटीचे आहे, गरजेचे आहे. कारण महात्मा फुले यांचा विचार हा परिवर्तनाचा, विज्ञानाचा पुरस्कार करणारा, समाजातील शेवटच्या माणसाचे हित जोपासणारा व त्यांच्या दु:खांची मांडणी करणारा आहे, तो वाढविला पाहिजे, अधिक वृद्धिंगत करायला हवा. महात्मा फुले यांचे हे विचार आजच्या काळातही समाजाच्या उभारणीसाठी अत्यंत उपयुक्त असून हे विचार देशातील शेवटच्या तरुणाच्या मनात रुजविण्याची आवश्यकता असल्याचे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले.
महात्मा ज्योतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाला १५० वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे राज्यातील सत्यशोधक चळवळीत काम करणाऱ्या मान्यवरांचा मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला.
यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, महिला प्रदेशाध्यक्षा मंजिरी धाडगे, सदानंद मंडलिक, प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, प्रदेश चिटणीस समाधान जेजुरकर, शहराध्यक्ष कविता कर्डक, जिल्हाध्यक्ष प्रा.ज्ञानेश्वर दराडे, डॉ.योगेश गोसावी, महिला जिल्हाध्यक्षा पूजा आहेर, शहराध्यक्ष आशा भंदूरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
संबंध समाजामध्ये अवैज्ञानिक परंपरा, अंधश्रद्धा, स्त्रीदास्य पद्धती, ब्राह्मण्य, अमानवी व माणुसकीला काळिमा फासणारे प्रकार देशात सुरु होते. यावेळी भगवान गौतम बुद्धांनी याला विरोध करून सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. महात्मा फुले यांनी याच सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. जातीभेद आणि अन्याय याची परिसीमा त्याकाळी गाठली गेली होती अशावेळी धार्मिक आणि सामाजिक सुधारणा असा दुहेरी भाव सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून मांडला गेला असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
महात्मा फुले यांनी गुलामगिरी, अस्पृश्यता, स्त्री दास्य, जनावरांच्या हत्या याला विरोध केला. व्यसनापासून दूर रहावे अशी शिकवण त्यांनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून दिली. सत्यशोधक समाजाचा केवळ सामाजिक सुधारणा हा हेतू नव्हता तर लोकप्रबोधन, शिक्षण सुधारणा, शेतकरी हित, सावकारी उच्चाटन यासह अनेक प्रश्नांवर काम केले असल्याचे सांगत महात्मा फुले यांनी मांडलेला शेती विज्ञानवादी विचार हा अतिशय महत्वाचा असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
महात्मा फुले यांचे हे विचार पुढे छत्रपती शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासह अनेक समाजसुधारकांनी रुजवले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून त्याचा जीर्णोद्धार केला. तसेच त्यांच्यावर पोवाडा तयार करून सत्य जगासमोर मांडले असेही शरद पवार यांनी यावेळी सांगितले.
देशात अद्यापही अंधश्रद्धा दूर झालेली नाही. ही अंधश्रद्धा दूर करण्यासाठी काही प्रामाणिक प्रयत्न देखील सुरु आहे. मात्र अनेक लोक देशांमध्ये अंधश्रद्धा वाढीला लागली पाहिजे म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे. आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी धर्माधर्मात जातीजातीत भांडणे लावण्याच्या प्रयत्नात आहेत. अन्याय अत्याचार होत आहे. हे सर्व थांबविण्यासाठी सत्यशोधक समाजाचे महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ.आंबेडकरांचे विचार प्रेरक असून हेच विचार देशाला या यादवीतून वाचवू शकतात असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
देशात महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा एकमेव नेता आहे, ते म्हणजे खासदार शरद पवार. महात्मा फुले यांनी जी आरक्षणाची संकल्पना मांडली त्यावर पवारानी प्रत्यक्ष काम केले. त्यांनी मंडल आयोगाची राज्यात अंमलबजावणी करून ओबीसींना शिक्षण, नोकरी आणि राजकरणात आरक्षण देण्याचे काम, देशातील महिलांना राजकारणात ५० टक्के आरक्षण देऊन प्रतिनिधित्व देण्याचे अतिशय महत्वपूर्ण काम त्यांनी केले. मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचे संसदेच्या प्रांगणात महात्मा फुले यांचा पुतळा बसविण्यासाठी काम पवार यांच्या प्रयत्नातून झाले असल्याचे छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
देशात आरक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. आरक्षण हटविण्याचे काम सद्या देशात सुरु आहे. विघातक शक्ती या आरक्षणाला न्यायालयात आव्हान देण्याचे काम करत आहे. हे आरक्षण टिकविण्यासाठी आपला न्यायालयीन लढा सुरू आहे. आपण दिलेले ओबीसींचे आरक्षण टिकविण्याची लढाई आपण जिंकलो आहे. मात्र अद्यापदेखील ही लढाई संपलेली नाही. आपली ही लढाई सुरु राहील. यापुढे आपल्याला जेव्हा जेव्हा गरज पडेल त्यावेळी रस्त्यावर उतरून आपल्याला लढाई लढावी लागेल. यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी सदैव तयार रहायला हवं असे आवाहन छगन भुजबळ यांनी यावेळी केले.
महात्मा फुले यांनी बहुजन समाजासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यशोधक समाजाची ही चळवळ ब्राम्हणांच्या विरोधात नव्हती तर ब्राम्ह्ण्यवादाच्या विरोधात होती. या सत्यशोधक चळवळीत आजही देशभरात अनेक लोक काम करत आहे. आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने या विचारांना चालना देणाऱ्या समाजसेवकांचा प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान व्हावा म्हणून या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगतानाच महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक समाजसेवकांनी बहुजन समाजाला शिक्षण देण्यासाठी आपले योगदान दिले. ज्यांनी आपल्याला शिक्षण दिले त्या फुले, शाहू, आंबेडकरांच्या प्रतिमांची तसेच त्यांच्या विचारांची पूजा करण्याची आवश्यकता असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून समता परिषदेचे मुख्य काम महाराष्ट्रात मंडल आयोग लागू करून ओबीसींना आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. पुणे येथे महात्मा फुले राष्ट्रीय स्मारक, नायगाव येथे सावित्रीबाई फुले स्मारक, दिल्ली येथे संसदेच्या परिसरात महात्मा फुले यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी, केंद्रीय शाळा व नोकऱ्यांमध्ये ओबीसींना आरक्षण मिळवून देण्यासाठी, ओबीसी विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती, मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे काम करण्यात आले. तसेच पुणे विद्यापीठाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यासाठी तसेच सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यासाठी प्रयत्न केले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरु केली. भिडेवाड्यात सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा सुरु करण्यासाठी आपले प्रयत्न सुरु असून भिडे वाड्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल असेही छगन भुजबळ यांनी यावेळी स्पष्ट केले.
देशामध्ये समाजात द्वेष निर्माण करण्याचे काम केले जात आहे. यासाठी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे काम सर्वांसमोर मांडण्याची आपली सर्वांची जबाबदारी असून त्यांचे विचारच देशातील ही विखारी लाट परतवू शकतात असे विचार डॉ.आ.ह साळुंखे यांनी व्यक्त केले.
यावेळी ज्येष्ठ विचारवंत प्रा.रावसाहेब कसबे यांनी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली ही ऐतिहासिक घटना असून या घटनेला दीडशे वर्ष पूर्ण होत आहे. आज दीडशे वर्षांनंतरही आपण या ऐतिहासिक घटनेच महत्व समजू शकलो नाही तर ती घटना वांझोटी ठरते असे मत व्यक्त केले. तसेच महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाला दीडशे वर्ष पूर्ण होत असून या सत्यशोधक विचारांवर आजही जे काम करत आहे त्या सर्वांना बळ देण्याची आवश्यकता असल्याचे ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी सांगितले. तर सत्यशोधक समाजाचे विचार घराघरापर्यंत नेण्याची गरज असल्याचे प्रा.हरी नरके यांनी यावेळी सांगितले.
या सत्यशोधक समाज गौरव सोहळ्यामध्ये ज्येष्ठ लेखक डॉ.आ.ह साळुंखे, संशोधक लेखक व ज्येष्ठ विचारवंत प्रा.रावसाहेब कसबे, ज्येष्ठ समाजसेवक डॉ.भारत पाटणकर आणि स्व.गेल ऑम्वेट, ज्येष्ठ संशोधक विचारवंत प्रा.हरी नरके यांचा एक लक्ष रुपये, शाल, सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. तर ज्येष्ठ समाजसेविका कमल विचारे, ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव हे आपल्या प्रकृतीच्या कारणास्तव तसेच प्रज्ञावंत साहित्यिक उत्तम कांबळे हे नियोजित कार्यक्रमामुळे उपस्थित न राहू शकल्याने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने त्यांच्या निवासस्थानी जाऊन सन्मान करण्यात येणार आहे. तसेच या प्रसंगी सत्यशोधक विवाहाचे काम करणारे प्रा.रघुनाथ ढोक व सावित्रीबाई फुले यांच्या महाराष्ट्रभर एकांकिका सादर करणाऱ्या प्रा.कविता म्हेत्रे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आभार कार्याध्यक्ष बापू भुजबळ यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा.डॉ.नागेश गवळी यांनी केले.
या कार्यक्रमाला राज्यभरातून महिला व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.