– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती
नांदेड :- जिल्ह्यातील देगलूर–बिलोली विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले जितेश अंतापूरकर यांनी शुक्रवारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अंतापूरकर यांचे स्वागत केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खा. अशोक चव्हाण, माजी खा.प्रताप पाटील चिखलीकर, आ. तुषार राठोड, ज्येष्ठ नेते राम पाटील रातोळीकर, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, विक्रांत पाटील आदी यावेळी उपस्थित होते. अंतापूरकर यांच्या प्रवेशामुळे नांदेड जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी आणखी मजबूत होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की लोकसभा निवडणुकीत नांदेड मतदारसंघात भाजपाचा थोडक्यात पराभव झाला. आता नांदेड जिल्ह्यातील परिस्थिती बदलली आहे. विधानसभा निवडणुकीत नांदेड जिल्ह्यात महायुतीला सर्वाधिक जागा मिळतील. अंतापुरकर यांच्या पाठीशी पक्ष खंबीरपणे उभा राहिल, असेही फडणवीस यांनी सांगितले.
ज्येष्ठ नेते खा. अशोक चव्हाण म्हणाले की, अंतापूरकर यांना काँग्रेसमध्ये अपमानास्पद वागणूक दिल्यामुळे त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या निर्णयाचा भाजपाला फायदा होईल.
अंतापूरकर म्हणाले की पक्षाकडून जी जबाबदारी सोपविली जाईल ती आपण निष्ठेने पार पाडू. अंतापूरकर यांनी शुक्रवारी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. देगलूर – बिलोली विधानसभा मतदारसंघातील अनेक जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी, माजी नगराध्यक्षांनी यावेळी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.